शेअरबाजाराची घसरगुंडी ट्रेडिंगला सुरुवात झाल्यापासूनची शेअरबाजाराची घसरगुंडी सुरूच आहे. निकालाचे अधिक कल हाती आल्यानंतर शेअर बाजारात सुधारणा होईल असा अंदाज होता, पण एनडीए आणि इंडिया आघाडीतील तुल्यबळ कलांमुळे शेअर बाजारातील अनिश्चितता कायम आहे.
BSE सेंसेक्स आणि निफ्टी 50 सह शेअर बाजारातल्या इतर इंडेक्समध्येही घसरण आहे. सेंसेक्समध्ये 11.30 वाजताच्या सुमारास 3600 पेक्षा अधिक पॉइंट्सची घसरण आहे. सेंसेक्स 73 हजारांच्या खाली आलाय, तर निफ्टी 50 मध्ये 1000 पॉइंट्सची घसरण होत निफ्टी 22 हजारांवर आलेला आहे. BSE बँकेक्स, मिड कॅप, स्मॉल कॅप असे सगळेच निर्देशांक घसरलेले आहेत.
दोन प्रमुख निर्देशांकांमध्ये 3% वाढ सोमवारच्या दिवशी नोंदवण्यात आली होती. भाजप आणि भाजपच्या नेतृत्त्वातील NDA आघाडीला बहुमत मिळेल, असा अंदाज बहुतेक एक्झिट पोल्सनी शनिवारी 1 जून रोजी वर्तवल्यानंतर 3 जूनला शेअर बाजारात तेजी आली होती. सेंसेक्स काल 76,400 च्या पातळीच्याही वर गेला होता. तर निफ्टी 50 निर्देशांकही 23,250च्या पातळीवर होता.