घरामध्ये साफसफाई करण्यासाठी आपण निरनिरळ्या क्लीनर्सचा वापर करीत असतो. घर आणि घरातील वस्तू निर्जंतुक व्हाव्यात या करिता मुख्यत्वे या क्लीनर्सचा वापर केला जात असतो. पण साफसफाई करण्याकरिता केवळ एकच क्लीनर असून काम भागत नाही. काचेच्या वस्तू पुसण्यासाठी एक क्लीनर, लाकडी सामानासाठी दुसरा, तर बाथरूम्स, घरातील फरशी ह्यांच्याकरिता देखील वेगवेगळ्या क्लीनर्सचा वापर आपण करीत असतो. ह्यासाठी आपले पुष्कळसे पैसेही खर्च होत असतात. त्यामुळे पैशांची बचत करून, तितकीच उत्तम सफाई देणारे काही क्लीनर्स आपण घरच्याघरी देखील तयार करू शकतो. एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात मिसळून हे मिश्रण स्टेनलेस स्टीलच्या वस्तू साफ करण्यासाठी वापरता येते. आजकाल फ्रीज, ओव्हन, टोस्टर, इत्यादी वस्तू स्टेनलेस स्टील फिनिशमध्ये जास्त पसंत केल्या जात आहेत. ह्या वस्तू हाताळताना ह्यांवर हातांचे ठसे उमटत असतात किंवा इतरही डाग पडत असतात. हे सर्व डाग घालवून स्टेनलेस स्टील चकविण्याच्या कामी पाणी आणि व्हिनेगरचे मिश्रण सहायक आहे. बाथरूम, किचनमधील नळ, किचनमधील सिंक चमकविण्यासही हे मिश्रण सहायक आहे. मात्र व्हिनेगर अॅसिडिक असल्यामुळे ग्रेनाईट किंवा संगमरवरी ओट्यावर वापरू नये.