दाराला असावे सुंदर तोरण

घराच्या सजावटीला मुख्य प्रवेशद्वारापासूनच सुरवात होते. कारण घराच्या प्रवेशद्वारातूनच आपण पाहुण्यांचे स्वागत करत असतो. घरात शुभ कार्य असल्यास आपण घराच्या दरवाज्यावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधतो. मात्र, आता सगळीकडे सिमेंटचे जंगल वाढल्याने शहरातून आंब्याची झाडे हद्दपार झाली आहेत. त्यामुळे घराच्या सजावटीसाठी बाजारात आलेल्या कृत्रिम तोरणांचा उपयोग करून घराच्या प्रवेशद्वाराचे सौंदर्य वाढविले जाते. 

बाजारात विविध प्रकारात सुंदर-सुंदर तोरण मिळतात. आर्टिफिशियल फ्लॉवरची रंगीबिरंगी तोरण, क्रिस्टल तोरण व मोत्यांचे तोरण घराच्या सौंदर्यात जणू भरच घालत असतात. साधारण 60 रुपयांपासून 180 रुपयांपर्यंत ही तोरणे उपलब्ध होतात.

क्रिस्टल तोरण दुरून चमकते व समोरच्या व्यक्तीचे मन मोहून टाकते. विविध रंगात असलेले क्रिस्टल तोरणावर कॉपरचे लटकते मोती लावलेले असतात. त्यामुळे ते अधिक सुंदर व आकर्षक वाटतात.
WD WD


लाकडावर आंब्याच्या पानाच्या आकारात गणपती असे तोरणही असते. बाजारात अशा तोरणांना मोठी मागणी आहे.

कापड व प्लास्टिक फ्लॉवरच्या तोरणामध्ये पिवळ्या-नारंगी झेंडूच्या फुलांच्या माळा तसेच प्लास्टिकची आंब्याची पाने असल्याने नॅचरल लूक या तोरणाला आलेला असतो. 'स्वस्तिक' व 'ॐ' च्या आकारात असलेल्या पताकामुळे हे तोरण अधिक आकर्षक दिसते.

पारंपारिक लूक यावा म्हणून तोरणांमध्ये रुद्राक्षांचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला दिसतो. लहान मोठ्या रूद्राक्षांच्या माळा आणि त्यात लाकडावर कोरलेले गणपती लावलेले असतात.