साहित्य संमेलनाची वादग्रस्त निवडणूक

मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे अविभाज्य घटक आहेत. यंदाचे साहित्य संमेलनही त्याला अपवाद ठरले नाही. यंदाच्या संमेलनात सुरवातीला राजन खान, वसंत आबाजी डहाके, द. ता. भोसले, म. द. हातकणंगलेकर व मीना कर्णिक हे उमेदवार होते. उमेदवारी जाहीर होऊन प्रचाराला सुरवात झाल्यानंतर वादविवादालाही सुरवात झाली.

मीन कर्णिक यांचा वृत्तपत्रातून चालणारा आक्रमक प्रचार लक्ष वेधून घेत होता. पण प्रभूंच्या संदर्भात हातकणंगलेकरांचे एक कथित वादग्रस्त वक्तव्य आले आणि मग प्रभू जास्तच आक्रमक झाल्या. हातकणंगलेकरांवर त्यांनी टीकेची राळ उठवली. अगदी न शोभेल अशा शब्दांतही त्यांच्यावर टीका केली. यानंतर हातकणंगलेकर शांत राहिले तरी बाईंची चीडचीड काही संपेना. त्यांनी आपल्या मतांच्या प्रसिद्धीसाठी मुंबईतल्या वृत्तपत्रांचा सहारा घेतला.

या खणखणाटी प्रचारातच मतदान झाले. औरंगाबादेत याची मतमोजणी झाल्यानंतर संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक प्रा. म.द. हातकणंगलेकर यांची बहुमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. ७८७ पात्र मतदारांपैकी ६४८ मतदारांनी मतदान केले़ २४ मते अवैध ठरली प्रतिस्पर्धी उमेदवार श्री. वसंत डहाके यांना १९६ मते मिळाली. तर प्रा. हातकणंगलेकर ३३६ मते मिळवून विजयी झाले. द. ता. भोसले, राजन खान यांच्यानंतर मीना कर्णिकांना मते मिळाली.

या निकालानंतर प्रभू जास्तच चिडल्या. त्यांनी ही निवडणूक अवैध पद्धतीने झाली असे सांगून न्यायालयात जाण्याची धमकी दिली. कारण आपण सर्व मतदारांशी संपर्क साधला होता. त्यावेळी सर्व मतदारांनी आपल्यालाच मते देणार असे छातीठोक सांगितले होते, असा युक्तीवाद त्यांनी केला. आपल्या युक्तीवादाच्या सक्षम मांडणीसाठी त्यांनी निकालस्थळी वकिलही आणला होता.

निकाल लागल्यानंतर स्वस्थ बसावे तर तेही नाही. त्यांनी सर्व सभासदांना खुले पत्र लिहिले. त्यात या मतदारांन त्यांचे मत केवळ आपल्यालाच पाठविले, असे लिहून पाठवावे असे लिहिले. या प्रकारामुळे तर मतदारही चिडले. विशेष म्हणजे हे पत्र त्यांनी वृत्तपत्रातही प्रसिद्ध केले. हे पाहिल्यानंतर साहित्य संमेलन निवडणुकीने यंदा खूपच खालची पातळी गाठल्याचेच दिसले. ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी तर प्रभूबाईंच्या या कृतीवर जाहीररित्या नाराजी व्यक्त केली.

बाईंच्या या कृतीची दखल साहित्य महामंडळाच्या लवादानानेही घेतली. त्यांनी या प्रकरणाची सुनावणी घेऊन बाईंना पन्नास हजारांचा दंड ठोठावला. मतदारांना आपले मतदान गुप्त ठेवण्याचा अधिकार असतो. पण बाईंनी मते कोणाला दिली असे विचारून या हक्कालाचा हरताळ फासला. सभासदांच्या लोकशाहीतील हक्कावरच गदा आणली. आता बाई कोर्टात जाण्याचीही तयारी करत आहे.


वास्तविक साहित्य संमेलन निवडणुकीत वाद होणे नवीन नाही. पण वादांनी यावेळी गाठलेली पातळी नवीन आहे. मीन प्रभू या चांगल्या प्रवासवर्णनकार लेखिका आहेत. त्यांची पुस्तकेही खूप गाजली आहेत. अनेक देशांचा प्रवास करून त्यांनी तेथील जग मराठी माणसांच्या समोर आणले, हे त्यांचे साहित्य कार्य खरोखरीच चांगले आहे. पण एक लेखिका म्हणून त्यांनी या लेखनातून लोकांमध्ये निर्माण केलेला आदर मात्र गमावला आहे.

याउलट हातकणंगलेकरांची प्रतिमा प्रसिद्धी पराड्मुख असणारा साहित्यिक अशी आहे. साहित्याचा रसरसून आस्वाद घेणारा आणि तितक्याच तटस्थपणे त्याकडे समीक्षक म्हणून पाहणारा हा कृष्णाकाठचा तपस्वी आहे. यापूर्वी कोणत्याही वादात त्यांचे नाव कधीच आले नाही. एक चिंतनशील आणि कुठल्याही बाजूकडे न झुकणारा तरीही वैचारीक बांधिलकीशी घट्ट नाते सांगणारा असा हा साहित्यिक आहे. त्यामुळे त्यांच्या या वयात त्यांना हे पद मिळणे हे जास्त योग्य आहे.

पण दुर्देवाने त्यांना हे पद सहजी मिळू शकले नाही. प्रभूंच्या वैचारीक थयथयाटामुळे निवडणुकीच्या प्रक्रियाच डागाळली गेली. खरे तर आता ही प्रक्रियाच बदलायला हवी. कारण अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक निवडणुकीच्या फडात उतरण्याचे टाळतात. कारण राजकारण या निवडणुकीला टळलेले नाही. कै. श्री. ना. पेंडसे, जयवंत दळवी. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, बा. भ. बोरकर असे मोठमोठे साहित्यिक पात्रता असूनही संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत. वास्तविक त्यांन हे पद सन्मानाने मिळायले हवे होते. त्यामुळे आता तरी याचा विचार होऊन मुळात अध्यक्ष निवडण्याच्या पद्धतीतच बदल व्हायला हवा.

वेबदुनिया वर वाचा