साहित्य संमेलनावर अरूण साधूंचा बहिष्कार

वेबदुनिया

शनिवार, 19 जानेवारी 2008 (17:30 IST)
सांगलीतील साहित्य संमेलनाला आज गालबोट लागले ते माजी संमेलनाध्यक्ष अरूण साधू यांच्या अनुपस्थितीचे. संमेलनात राजकारण्यांनी, उद्योगपतींनी यावे, पण त्यांना महत्त्व देऊ नये अशी साधू यांची भूमिका होती.

साहित्य महामंडळाच्या बैठकीत सांगलीच्या स्वागत समितीने ती मान्यही केली होती. मात्र, तिची अंमलबजावणी न केल्यामुळे साधूंनी या संमेलनावर बहिष्कार टाकला. त्यामुळे आज संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे मावळत्या अध्यक्षांकडून पुढच्या अध्यक्षांकडे देण्याची प्रथाही मोडली गेली. महामंडळाचे कौतिकराव ठाले-पाटील यांनी ही सूत्रे अखेर हातकणंगलेकर यांच्याकडे सुपूर्द केली.

साधू काल ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. त्यानंतरच त्यांनी आपली भूमिका जाहीरपणे मांडली. आपण बहिष्कार घालत नसून अनुपस्थित रहाणार असल्याचे सांगितले. स्वागत समितीच्या भूमिकेचा निषेध कुणी तरी केला पाहिजे. मी तो माझ्या अनुपस्थितीने करत आहे, असे ते म्हणाले. उद्गाटनाला येणार नसल्याने उर्वरित संमेलनाला हजेरी लावण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

वेबदुनिया वर वाचा