अहिंसात्मक क्रांतीबाबत समाधानी नव्हतो

ND
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या 'आझादी की कहानी' या पुस्तकात भारत छोडो आंदोलन आणि त्यावेळी भारलेले वातावरण याविषयी अतिशय छान वर्णन केले आहे.

ते पुस्तकात म्हणतात, कॉंग्रेस कार्यकारी समितीचा यासंदर्भातील ठराव प्रकाशित झाल्यावर संपूर्ण देशात उत्साहाची लहर पसरली. ठरावात कोणत्या बाबींचा समावेश आहे हे माहीत नसतानाही ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्यासाठी कॉंग्रेस जनआंदोलन उभारणार असल्याची अनुभूती जनसामान्यांना झाली होती. काही दिवसातच सरकार व नागरिक 'भारत छोडो आंदोलना'च्या स्वरूपाबाबत चर्चा करू लागले. ठराव मंजूर केल्यानंतर कार्यकारी समितीने सरकारची प्रतिक्रिया अजमावण्याचा निर्णय घेतला.

सरकारने मागणी मान्य केली किंवा सामंजस्याचा निर्णय घेतल्यास चर्चेचा पर्याय खुला राहील, नाहीतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली संघर्षास सुरुवात करता येईल, असे ठरविण्यात आले होते. कार्यकारी समितीच्या निर्णयाबाबत उत्सुकता असल्याने देशा-परदेशातील पत्रकारांनी वर्धा गाठले होते. गांधीजींनी पंधरा जुलैला पत्रकार परिषद बोलावली. गांधींनी एका प्रश्नाच्या उत्तरात आंदोलनास सुरूवात झाल्यास ती ब्रिटिशाविरुद्ध अहिंसात्मक क्रांती असेल, असे सांगितले. मला मात्र हे फारसे पटत नव्हते. हे आता मान्य करण्यास काही हरकत नाही.

सरळ सरळ कारवाई करावी या बाजूचा मी होतो. कारण या ठरावाबाबत मी आशावादी नव्हतो. सरकारची प्रतिक्रिया काय असेल याविषयी माझा अंदाज निश्चित होता. गांधी किंवा त्यांच्या प्रतिनिधीस व्हाईसरायने भेटण्यास असर्मथता दर्शवल्याचे मला आश्चर्य वाटले नाही. या घटनेनंतर मी अखिल भारतीय कॉंग्रेसची बैठक बोलावून या मुद्यावर गांभीर्याने विचार करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत सात ऑगस्ट 1942 रोजी बैठक बोलावण्यात आली. गांधीनीही आपले विचार मांडले. दोन दिवसाच्या विचारविनिमयानंतर साम्यवाद्यांच्या विरोधानंतर आठ ऑगस्टला सायंकाळी 'भारत छोडो' हा ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर झाला.

वेबदुनिया वर वाचा