अनिल अवचट यांचं निधन, हरहुन्नरी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता हरपला

गुरूवार, 27 जानेवारी 2022 (16:27 IST)
ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं पुण्यात निधन झालंय. ते 76 वर्षांचे होते.
 
आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास त्यांचं निधन झालं.
 
सामाजिक प्रश्नांसोबतच अनिल अवचट यांनी विविध विषयांवर लेखन केलं. 'रिपोर्ताज' हा दीर्घ लेखन प्रकार त्यांनी मराठीत रूढ केला.
 
लेखनासोबतच चित्रकला आणि ओरिगामीचीही त्यांना आवड होती. ते उत्तम बासरीही वाजवत.
 
मित्र परिवार, वाचक आणि मुक्तांगणचे रुग्ण या सगळ्यांमध्येच अनिल अवचट 'बाबा' म्हणूनच लोकप्रिय होते.
 
अनिल अवचट यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्यासोबत 'मुक्तांगण' या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती. आज मुक्तांगण व्यसनमुक्तीसोबतच अनेक क्षेत्रांत कार्य करत आहे.
 
अनिल अवचट यांची मुलगी डॉ. मुक्ता पुणतांबेकर आता मुक्तांगणचं काम पाहतात.
 
अवचटांना मान्यवरांकडून श्रद्धांजली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल अवचटांना श्रद्धांजली वाहताना म्हटलंय, "साहित्यातून, पत्रकारितेतून सामाजिक कार्याचा डोंगर उभा करता येतो, याचे आदर्श उदाहरण ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी घालून दिले. सेवाव्रत सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि हाडाचा पत्रकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे आपल्यातून निघून जाणे क्लेशदायक आहे."
 
चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी मुक्तांगणवर 'मुक्ती' नावाचा सिनेमा केला होता. हा सिनेमा आणि अनिल अवचटांविषयीच्या आठवणी त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितल्या.
 
सुनील सुकथनकर म्हणाले, "अनिल अवचटांच्या आग्रहामुळे मी अहो अनिल काकांपासून ते अरे अनिल काकांपर्यंत पोहचलो. सुमित्रा भावे आणि अनिल अवचट या दोघांची मैत्री खूप सुंदर होती. त्यांचं नेहमीच घरी येणं जाणं असायचं. कॉलेजवयात असताना माझी आणि त्यांची ओळख झाली. मैत्री सारखं त्याचं स्वरूप होतं. अनेक शूटिंगला ते यायचे. गप्पा मारायचे. त्याचं धागे उभे आडवे हे पुस्तक तयार होत होतं तेव्हा डीटीपी वगैरे काही नव्हतं. त्याची हाताने कॉपी लिहावी लागत होती. तेव्हा मी आणि माझ्या मित्राने ती लिहून काढली होती. तेव्हा ते लेख अजून जास्त समजले होते. कॉलेज वयापासून जी सामाजिक जाणीव वाढत गेली ती त्याच्या सारख्या लेखकामुळे वाढत गेली.
 
"मुक्तांगणवर आम्ही मुक्ती नावाची फिल्म केली होती. तेव्हा अनिता अवचट यांच्याशीसुद्धा खूप जवळून संबंध आला. ती फिल्म करताना जाणवलं की व्यसनमुक्तीचा त्यांनी आखलेला प्रवास खूप सुंदर होता. त्याच्यामध्ये अनेक कलागुण होते. एका माणसाच्या ठायी अनेक कला असणं हे खूप अवघड आहे. कुठल्याही कलेत त्यांनी पुढे जायचं ठरवलं असतं तर त्यात तो सर्वोच्च स्थानावर गेला असता.  लेखन आणि सामाजिक कार्य यावर त्याने स्वतःच लक्ष केंद्रित केलं."
 
अनिल अवचटांना श्रद्धांजली वाहताना भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय, "ज्येष्ठ साहित्यिक आणि खराखुरा कलाकार माणूस. गेली 50 वर्ष त्यांनी आपल्या लिखाणाची छाप उमटवली. सतत प्रसन्न राहिले. मी 20 वर्ष त्यांच्या कॉलनीत राहिलो. सर्व लहान मुलांचा दोस्त अनिल अवचट होते. समाजाच्या तळागाळातील लोकांची माहिती त्यांनी पुढे आणली."
 
तर ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनीही अनिल अवचटांना श्रद्धांतली वाहिली. ते म्हणाले, "अनिल आणि माझी गेल्या 52 वर्षांची मैत्री. मनोहर साप्ताहिकाची माझी शेवटची नोकरी. त्या साप्ताहिकमध्ये तो नियमीत लेखन करत होता. त्यांचे स्पेशल रिपोर्ताज मनोहर मध्ये येत गेले त्यामुळे त्यांच्याशी नियमीत संवाद होत होता. अजूनही तो संवाद टिकून होता. तो उत्तम बासरी वाजवायचा, समोरच्याला बोलकं करायचा. त्याला काहीही विचारलं तरी चालायचं."
 
डॉक्टर, पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्य
अनिल अवचटांचा जन्म ओतूर येथे झाला. त्यांनी पुण्याच्या बी.जे मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यात त्यांचं मन रमलं नाही म्हणून ते युक्रांदच्या चळवळीत सामील झाले. त्यातही फार काळ टिकले नाही. मग ते पूर्णवेळ लेखन क्षेत्रात उडी घेतली.
 
त्यांची पत्नी सुनंदा मानसोपचारतज्ज्ञ होती. त्यांच्या साथीने अवचटांनी पुण्यात मुक्तांगण हे व्यसनमुक्ती केंद्र चालू केले. हे केंद्र अजिबात चालू नये अशी प्रतिक्रिया त्याच्या उद्घाटनप्रसंगी पु.ल.देशपांडेंनी दिली होती.
 
पत्रकार म्हणून त्यांनी विविधांगी विषयावर लेखन केले. ते वेळोवेळी दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालं आहे. या लेखांचं संकलन 'रिपोर्टिंगचे दिवस' 'माणसं' अशा अनेक पुस्तकांतून त्यांनी मांडलं. स्वत:विषयी थोडेसे या आत्मचरित्रपर लेखनात त्यांनी स्वत:च्या आयुष्याबद्दल विस्ताराने लिहिलं आहे. मेडिकलच्या दिवसातच आपण लोकांशी बोलून योग्य पद्धतीने ते उतरवू शकतो अशी उपरती झाल्याचं ते 'रिपोर्टिंगचे दिवस' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात.
 
तळागाळातल्या लोकांशी सहज संवाद हे अवचटांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्या अनुभवाविषयी अवचट सांगायचे, "समाजातल्या खालच्या थरातल्या लोकांशी बोलायला गेलो, कागद काढला की त्यांची बोलतीच बंद व्हायची. त्या भीतीमागे अनेक सरकारी लोकांनी फसवलेले पूर्वीचे प्रसंग असतील, कोर्टकचेऱ्या असतील आणखीही काही प्रसंग असतील. कागदाची भीती आपल्या मध्यमवर्गीयांना कळूच शकणार नाही. आपल्यापुढे कागद येतो, तो प्रेमपत्राच्या स्वरुपात, धार्मिक पोथीच्या स्वरुपात. इथे येतो तो भीतीच्या स्वरुपात. मग मी कागदच सोडून दिला."
 
2021मध्ये त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. तर त्यांच्या 'सृष्टीत गोष्टीत' या पुस्तकाला साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार मिळाला होता.
 
आनंदाची व्याख्या सांगताना अनिल अवचट यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत म्हटलं होतं, "माझी आई पहाटे उठून सडा घालायची, घरासमोरचा रस्ता झाडायची आणि मग दररोज वेगवेगळी रांगोळी काढायची. ते बघायला आणि कौतुक करायलाही कुणी नव्हतं. मग ती रांगोळी पुसली जायची. त्याची तिला काही खंत नव्हती.
 
"तिच्यापासून मी एक शिकलो की, एखादी गोष्ट करताना जो आनंद मिळतो तोच आपला आनंद. बाकी आनंद काही आपल्या हातात नाहीये. कुणीतरी कौतुक केलं पाहिजे, असं काहीही नाही. माझ्यासाठी प्रोसेसमधला आनंद हे महत्त्वाचं आणि तो मला माझ्या आईने शिकवला."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती