हिंदी साहित्यविश्वात ‘उपन्यास सम्राट म्हणून गौरविल्या गेलेल्या मुन्शी प्रेमचंद यांचा आज स्मृतिदिन. युगप्रवर्तक हिंदी-उर्दू कादंबरीकार व कथालेखक असणार्या प्रेमचंदांचा जन्म 31 जुलै 1880 रोजी झाला. लमही, जि.पांडेपूर, या उत्तर प्रदेशातील गावी जन्मलेल्या या प्रतिभावंताने ‘नबाबराय’ या टोपणनावाने लेखन सुरू केले होते. पण 1909 मध्ये प्रसिध्द झालेला ‘सोजे वतन’ हा त्यांचा उर्दू काव्यसंग्रह त्यातील प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीमुळे ब्रिटिशांनी जप्त केला आणि मग आपले मित्र दया नारायण निगम यांच्या सूचनेवरून त्यांनी प्रेमचंद हे नाव धारण केले.
शिक्षण खातत्यात नोकरी करणार्या प्रेमचंदांनी 1921 मध्ये गांधीजींच्या प्रभावामुळे नोकरी सोडली. 15 कादंबर्या आणि 300 कथा लिहिणार्या प्रेमचंदांच्या सेवासदन, प्रेमाश्रम, रंगभूमी, निर्मला, कायाकल्प, गबन, कर्मभूमी, गोदान या महत्त्वाच्या कादंबर्या. गोदान ही त्यांची अमर कलाकृती भारतीय कृषक जीवनाचे महाकाव्य म्हणून ओळखली जाते. संग्राम, कर्बला, प्रेम की वेदी ही त्यांची तीन नाटके. अशा या उपन्यास सम्राटाचे 8 ऑक्टोबर 1936 रोजी निधन झाले.