आपडी-थापडी

मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (12:22 IST)
परवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर रेललेले. आजीही त्यांच्यातीलच एक होऊन गेल्या होत्या. मुलांना त्या बहुधा गोष्टी सांगत असाव्यात. गोष्टींना कंटाळलेल्या मुलांनी एकच गिल्ला सुरू केला... 
 
आजी, आजी  ऽ आपडी- थापडी खेळू ना गं. 
रस्त्याने चाललेला मी 'आपडी थापडी' ऐकताच थबकलो. ही आपडी-थापडी पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी माझ्या बालमुठीतून घरंगळून गेली होती. मधल्या काळात मोठे होणे काय असते, ते पुरेपूर अनुभवले, त्याचे चटके सोसले. हरवलेल्या बालपणासोबत खूप काही हरवले, पण ही ‘आपडी थापडी’ मेंदूच्या कोठल्या तरी कोपऱ्यात तशीच राहिली. मधल्या काळात माझे लग्न झाले. मला मुले झाली, पण त्यांच्याशी मला कोठे खेळता आली ही ‘आपडी-थापडी’ सारखी अवीट जोडीची 'खेळगाणी'? मी मला काळाच्या बदलात केवळ ढकलत राहिलो, पुढे पुढे; पण बालपणीचे किती मोठे वैभव, त्या फुलपंखी दिवसांतील गमतीजमती, ते खेळ, ती गाणी, सारे तेथल्या तेथे सोडून आलो. 
 
त्या 'आपडी-थापडीच्या' खेळाने मला माझ्या बालपणात नेऊन सोडले. रस्त्याने जात होतो, पण माझा पाय जागेवरून हलेना. मला त्यांची ‘आपडी-थापडी’ पाहायची होती. बिनपैशांचा तो आनंदआपल्या आयुष्या  तून निघून गेला आहे. मी लहान होऊन तो पकडू पाहत होतो. 
 
कोणी काय म्हणेल याची पर्वा न करता मी त्या आजी-नातवंडांच्या खेळाकडे बघू लागलो. मुलांनी कोंडाळे केले होते. आजीसमोर प्रत्येकाने त्यांच्या छोट्या छोट्या हातांचे पंजे एकमेकांवर पालथे ठेवले होते अन् सुरू झाली...
 
(१)
आपडी-थापडी....
गुळाची पापडी 
धम्मक लाडू.... 
तेल पाडू 
तेलंगीच्या.... 
तीन पुऱ्या 
चाकवताचं.... 
एकच पान 
धर गं बेबी.... 
हाच कान' 
 
आजी मुलांच्या पालथ्या हातांवर क्रमाक्रमाने उलटापालटा हात थोपटत गाणे म्हणत होती. 'धर गं बेबी हाच कान' म्हणताच त्या छोट्या छोट्या बोटांनी एकमेकांचे कान पकडले, आजीचेही पकडले. कान धरून, ते सारे कोंडाळे झुलू लागले आणि पुढचे गाणे सुरू झाले. 
 
(२)
'च्याऊ म्याऊ
पितळीचं पाणी पिऊ
भुर्रर्रर्रकन उडून जाऊ'
असे म्हणत सर्वांनी त्यांचे कानांवरील हात सोडून हवेत फडकावले. जसे छोटे छोटे पक्षीच उडाले. मी तल्लीन झालो होतो. माझे मला मी रस्त्यात उभा राहून मुलांच्या खेळात रमलो आहे याचे भानही उरले नव्हते. मला माझे निसटून गेलेले बालपण त्या खेळगाण्यांतून पुन्हा मिळाले होते. माझ्यातील लहान मूल त्या ‘आपडी-थापडी’ ने जागवले होते. माझ्या डोळ्यांपुढून माझे खेड्यात गेलेले बालपण सरकू लागले. संध्याकाळी शाळेतून आले, पाटी-दप्तर घरात भिरकावले, की आम्ही खेळायला मोकळे! गरिबी सगळ्यांच्याच घरी होती. आजूबाजूचे सगळे मित्रही त्याच परिस्थितीतील. आमचे खेळही खर्चिक नव्हते. सगळे तोंडभांडवल किंवा अंगमेहनत असा व्यायाम घडवणारे...ओट्यावर बसलेली आजी दोन्ही हातांनी डोळे झाकायची आणि म्हणायची
 
(३) ‘आया भोया
पाटीभर लाह्या 
वाघाचं पिल्लू
छुप गया.....'
मग सुरू व्हायची त्याच्या लपलेल्या सवंगड्यांची लपाछपी. वाघाच्या पिल्लावर राज्य आलेले. तो मग इकडे तिकडे कानाकोपऱ्यात शोधीत फिरे. पहिल्यांदा जो सापडला त्याच्यावर राज्य. पुन्हा त्याचे डोळे झाकून 
'आया भोया' सुरू!....
एका खेळाने कंटाळले, की दुसरा खेळ. असेच अन् या सगळ्या खेळांभोवती काही काही गाणी असतच. त्याचे तेव्हा काही वाटत नसे - आज आठवून मोठी गंमत वाटते. आराधरीचा खेळ खेळताना सगळे गडी गोल रिंगण करून जाळी धरत. जाळी धरली, की कोणावर राज्य येणार यासाठी मग हे गाणे सुरू व्हायचे
 
(४) 'इरिंग मिरिंग
लवंगा तिरिंग 
लवंगा तिरीचा 
डुगडुग बाजा
गाई गोपी उतरला राजा... 
उतरला राजा' 
आणि गंमत अशी, की जो राजा बनून उतरायचा त्याच्यावरच राज्य आलेले असायचे. आराधरीत खूप पळापळ व्हायची. हुलकावण्या देत पळणाऱ्यांपैकी कोणा एकाला पकडलं, की त्याच्यावर राज्य!....
मुलींची गाणी आणखी वेगळीच असत- 
 
(५) इत्ता इत्ता पाणी
गोल गोल राणी...!!
म्हणत मुलींचे खेळ रंगत. एरवी भित्र्या, काकूबाई असणाऱ्या मुली खेळताना किती धीट होत!
 
(६) 'कोरा कागद निळी शाई
आम्ही कोणाला भीत नाही 
दगड का माती?'
हा दगड-मातीचाही खेळ छानच होता. दगड म्हटले, की मातीवर उभे राहायचे अन माती म्हटले, की दगडावर! धमाल यायची....!! आकाशात विमानाचा घरघर आवाज ऐकू येऊ लागला, की सगळी बच्चेकंपनी विमान पाहायला अंगणात जाई. आभाळात विमानाचा शोध सुरू होई. ते विमान साखळी सोडून लहान मुलांना विमानात बसवून घेते असाही काहीतरी समज होता...
 
(७) आम्ही 
'ईमान ईमान साखळी सोड...' असेही त्या आकाशात उडणाऱ्या विमानकडे पाहून म्हणत असू. जेव्हा एसटीतही क्वचितच बसायला मिळे त्या काळातील ती कल्पना!...संध्याकाळी आभाळातून बगळ्यांची माळ हमखास उडताना दिसे, मग आम्ही हे गाणे बड बडत असू..
 
८) 'बगळ्या बगळ्या कवडी दे, धारणगावची नवरी दे' 
असे नखांवर नखे घासून गाणे म्हणत असू. नखांवर तेव्हा तांदळाच्या कणीसारखे काहीतरी डाग असत. अनेक मुलांच्या नखांवर ते असत. त्यालाच आम्ही कवड्या म्हणत असू. बगळे आपले उडत जायचे, पण आम्हाला मात्र कवड्या मिळालेल्या असत, नखांवर...!! आकाशात ढग भरून आले, की पावसाचे वातावरण तयार होई. मातीचा मस्त सुवास, गार वारा सुटलेला, अशा वेळी अंगणात गोल गोल फिरत..
 
(९) 'येरे येरे पावसा 
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा 
पाऊस आला मोठा 
येगं येगं सरी 
माझे मडके भरी 
सर आली धावून
मडके गेले वाहून'

हे पावसाचे गाणे तर त्या पिढ्यांतील प्रत्येकानेच त्या त्या वेळी म्हटले आहे. पाऊस पडून गेल्यानंतर अंगणातील मऊ वाळूचे खोपे तयार करण्याची लगबग सुरू होई. पायाच्या पावलावर पावसाने मऊ झालेली माती थापून आभाळाला वाकुल्या दाखवत वाळूची घरे बनवत असू. घर हळूच पाऊल काढताना अनेकदा पडून जाई, तर कधी कधी खोपा बने. तो आनंद शब्दांच्या पली कडचा...

आम्ही नवरात्रात गावाबाहेरच्या वडजाई देवीला जात असू. रस्त्यात आजूबाजूला खळगी होती. त्या खळग्यांमध्ये इंगळ्यांची बिळं असत. आम्ही त्या बिळांतून विषारी इंगळ्या काढून त्यांची झुंज लावण्याचा थरारक जीवघेणा खेळही त्या नकळत्या वयात खेळत असू. इंगळी काढण्याचा आमचा एक मंत्र होता. आम्ही करवडाचा फोक हातात घेऊन तो इंगळीच्या बिळावर घासत असू. काडीने घासताना बिळातून माती-खडे आत पडत.तोंडाने मंत्र सुरू...
 
(१०) इंगळी का पिंगळी सलाम करती,सलाम करती,,
अण्णाजी पाटलाला बोलीती बोलीती
सुया मारुनी मंत्र फुकिती 
मंत्र फुकिती......' 
मंत्र म्हणून पुरा होण्याच्या आतच 
 
चवताळलेली इंगळी काडीला डंख देत बाहेर येई. कमरेचा करगोटा तोडून, फास मारून इंगळीची नांगी बांधून तिला दुसऱ्या बिळात सोडण्यात येई. पहिली इंगळी दुसरीला बाहेर काढून बरोबर घेऊन येई. तो थरारक खेळ आठवून अंगावर काटा येतो. थोड्याच दिवसांत दिवाळीची नवलाई येई. हातात सुरसुऱ्या घेऊन..
 
(१२) 'दिन दिन दिवाळी 
गाई म्हशी ओवाळी 
गाई म्हशी कोणाच्या 
लक्षुमणाच्या'
असे म्हणत सुरसुऱ्या ओवाळीत दिवाळीचे गाणे म्हटले जाई. दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी सहामाही परीक्षा असे. तिचे ओझे वाटायचे. दिवाळीच्या आनंदापूर्वी केवढा मोठा अडथळा!! शाळा नेहमी खेळण्याच्या आड येते असे वाटायचे. मग शाळा सुटली की कोण आनंद...

(१३)
शाळा सुटली पाटी फुटली
आई मला भज्यानं मारलं त्याच्या काय बापाचं खाल्लं
... आम्ही लहानपणी असे एक रडगाणेही म्हणत असू. घरातील लहान मुले सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या बहिणीभावांकडे असे. तशा वेळी मोठी बहीण आईची जागा घेत असे. ती तिच्या भावंडांना खेळवताना. 
 
(१४) 'इथं इथं नाच रे मोरा 
बाळ देई चारा 
चारा खा... 
पाणी पी...
भुर्रर्र उडून जा...' ..
अशी गाणी म्हटली जात..!
लहानग्याचे कौतुक करताना,त्याला तीट लावताना
 
(१५) 'अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा तीटट् लावू' 
असे छान गाणे म्हटले जाई...लहान मुलांचे संगोपन करताना अशी अनेक गाणी गात त्यांचे बालपण फुलवले जाई. खेळगाण्यांनी तेव्हाचे आमचे बालपण व्यापून टाकलेले होते...!!
ती गाणी एका पिढीकडून दुसरीकडे आपोआप हस्तांतरित होत होती. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नव्हते. 
मोठी ताई लहानग्या भावाला खेळवताना उताणी झोपून त्याला पायावर बसवी व पायाला झोका देत, खालीवर करत त्याच्याशी ‘हाट घोडा हाट’ खेळू लागे...
 
(१६) 'हाट घोडा हाट,
बाजाराची वाट
बाजाराला कोण जातं
दादा वहिनी
घरी कोण राहतं 
आम्ही दोघी बहिणी 
असे खेळता खेळता बहिणी भावांचे मेतकुट जमे...!!
ब-याचदा लहान मुले मुलींच्या मध्येच खेळत. बहिणीच्या मैत्रिणींमध्ये मुलगा खेळू लागला, की 'पोरींमध्ये पोरगा भाजून खातो कोंबडा...' असे त्याला चिडवले जाई..!! कधी एकमेकांना पाठीवर घेत  हे गाणे गायचे..
 
(१७) 'वऱ्हाटा का पाटा 
गोल गोल वाटा'
असा वऱ्हाट्या-पाट्याचा खेळ सुरू होई..!!मुलींचे अपलम-चपलम सागरबिट्ट्या,ठिकरा-ठिकरी असे खेळही रंगत.
 
ते खेळ खेळताना म्हटली जाणारी खेळगाणी हीच आमच्या पिढीची बडबडगीते होती. ती म्हणत आमचे बालपण समृद्ध झाले. पण आम्ही तो वारसा पुढील पिढीकडे पोचवायला कमी पडलो. ती साखळी आमच्या पिढीशी काळाच्या बदलांमध्ये येऊनच तुटली त्याचे दुःख मोठे आहे. मला त्या आपडी थापडी वाल्या आजींचा हेवा वाटला. 
 
कौतुकही वाटले. त्यांनी त्यांचं हरवलेलं बालपण मुलांत मूल होऊन आपडी-थापडी खेळताना पुन्हा जिवंत केले होते...! मुलांनी हट्ट धरला तेव्हा त्यांनी गाणे म्हणायला सुरुवात केली..
 
(१८) 'बगळ्या बगळ्या नाच रे,
तुझी पिल्लं पाच रे
एक पिल्लू मेलं
गाडीत घालून नेलं, 
गाडी गेली डोंगराला, 
आपण जाऊ बाजाराला, 
बाजारातून आणल्या पाट्या, 
साऱ्या मुलांना वाटल्या..
 
(१९)  एक मूल चुकलं
छडी खाली लपलं
छडी लागे छमछम
विद्या येई घमघम' 
मला छमछम छडी आठवली, चिमुकल्या हातांवरचे ते छडीचे वळ घमघमणाऱ्या विद्येकडे घेऊन गेले. प्रतिकूलतेतून मिळणारा आनंद शोधणारे आमचे बालपण कितीतरी समृद्ध होते! बदल होणार आहेतच. मात्र आमच्या पिढीने जे अनुभवले, ते नव्या पिढीला आम्ही नाही देऊ शकलो. आम्ही पुढच्या पिढीला भौतिक सुखे मनमुराद देऊ केली. आम्हाला बालपणी जे मिळाले नाही, ते सुख मुलांना पैशाच्या माध्यमातून नको तितके देण्याचा प्रयत्न केला - पण देण्याजोगे बरेच काही न देताच. त्यातील ती खेळगाणी राहूनच गेली द्यायची.
 
- सोशल मीडिया साभार

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती