हा चंद्र

बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (16:21 IST)
या चंद्राचे त्या चंद्राशी मुळीच नाही काही नाते
त्या चंद्रावर अंतरिक्ष-यानात बसूनी माकड,मानव, कूत्री यांना जाता येते
 
या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही
हा ही नभाचा मानकरी पण लक्ष मनांच्या इंद्रगुहांतून भटकत राही
 
नटखट मोठा ढोंगी सोंगी, लिंबोणीच्या झाडामागे कधी लपतो मुलाप्रमाणे
पीन स्तनांच्या दरेत केव्हा चुरुन जातो फुलाप्रमणे
 
भग्न मंदीरावरी केधवा बृहस्पतिसम करतो चिंतन
कधी बावळा तळ्यात बुडतो थरथर कापत बघतो आतून
 
तट घुमटावर केव्हा चढतो, कधी विदुषक पाणवठ्यावर घसरुन पडतो
कुठे घराच्या कौलारावरुनी उतरुन खाली शेजेवरती
तिथे कुणाची कमल पापणी हळूच उघडून नयनी शिरतो
कुठे कुणाच्या मूक्त मनस्वी प्रतिभेसाठी द्वारपाल होऊनी जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो
 
अशा बिलंदर अनंतफंदी या चंद्राचे त्या चन्द्राशी कुठले नाते?
त्या चन्द्रावर अंतरिक्ष-यानात बसूनी शास्त्रज्ञांना जाता येते
रसीक मनांना या चंद्राला पळ्भर केव्हा डोळ्यात वा जळात केवळ धरता येते
 
- कुसुमाग्रज

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती