काव्य सखी

सोमवार, 21 मार्च 2022 (16:04 IST)
जीवनाच्या नागमोडी वाटेवरती
तू एकच माझी सखी
तू एकच माझी सोबती
 
माझे अंतर्मन कोरते
शब्द तुझे घेऊनी
घडवते जीवन दर्शन
साथ तुझी घेऊनी
माझ्या मनाच्या भावना
असतात तुझ्या संवेदना
तू माझ्या अंतर्मनाची सोबती
तू एकच माझी सखी
 
बालपण रंगवले तुझ्या सवे
भातुकली मधली तू बाहुली
विटीदांडू चा खेळ खेळते
तुज सवे, रागवा, रुसवी
भांडाभांडी ती बालपणाची
त्याच्यात ही तू माझी
बाल मैत्रीण होते
तू माझ्या बालमनीची निष्पाप कॄति
तू एकच माझी सखी
 
बालपण गेले सरून
केले तारुण्यात पदार्पण
माझ्या सप्तरंगी जीवनाची
तू माझी सदैव सावली
कधी मिळाले सुख जरी
हसून तुला सांगितले
दुःखाची करुण वेदना
तुझ्या हॄदयात कोरली मी
तू माझ्या सुख दुःखाची संगीनी
तू एकच माझी सखी
 
आजवरची अमीट मैत्री 
राहो, भविष्यात ही
दीपस्तंभ बन तू माझा
जीवनाच्या वाटेवरी
आपल्या प्रीती ची  गोडी 
जशी दूध साखर नैवेद्याची
न देवो देव दुरावा
तुझ्या अन् माझ्या प्रीती ला
 हे माझी काव्य सखी
आपली सोबत राहावी
आजीवन अशीच
तू एकच माझी सखी
तू एकच माझी सोबती
 
सौ. स्वाती दांडेकर, इंदूर

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती