शिकारीचा आजचा सातवा दिवस होता. संघ्याकाळी टॉर्च आणि धनुष्यबाण घेऊन तो जंगलाकडे निघाला. शिकारीचा शोध सुरू झाला आणि अचानक त्याला आदिवासी वस्तीच्या जवळच्या झुडपाजवळ काही तरी दिसलं. तो थांबला. झाडाच्या कडेला हरण उभे होते. त्या हरणावर त्याने नेम धरला आणि बाण सोडणार तोच तो थबकला. त्याने पुन्हा त्या हरणाच्या डोळयात पाहिले आणि त्याच्या हातातला धनुष्यबाण निखळला...
गेले सहा दिवस तो सतत तिथं यायचा शिकारीला निघाला की ते हरण त्याला तिथंच उभं असलेलं दिसायचं. तो रोज त्या हरणावर लक्ष केंद्रीत करून नेम धरायचा आणि त्याच्या डोळ्यांतला करुण भाव पाहून त्याच्या हातातला धनुष्यबाण निखळायचा. हे असं का घडतयं या विचारानं त्याला अस्वस्थ केलं होतं.
त्यानं ठरवलं आणि त्या जंगलातल्या एका थोराड आदिवासी गृहस्थाला त्यानं विचारलं. त्याला सांगितलं की ते हरण रोज तिथं येत आणि तो त्याच्यावर नेम धरूनही बाण चालवू का शकत नाही.
तो वृध्द म्हणाला, खरं सांगू हे हरीण रोज आम्ही वाजत असलेला ढोल ऐकण्यासाठी इथं येतं. वा-याचा आवाज झाला तरीही घाबरून पळून जाणारे भित्रे हरीण ढोल ऐकायला येत हे काही त्याला पटलं नाही. त्यानं पुन्हा विचारलं. हे कसं शक्य आहे, हरणासारख्या भित्र्या प्राण्याने इतकं साहस करणं शक्यच नाही. त्याच्या डोळ्यात तो करूण भाव का असतो, की जो पाहताच शिका-याच्या हातातलं धनुष्यबाण खाली पडतो. त्याची गोंधळलेली अवस्था पाहताच तो वृध्द म्हणाला, ते हरीण इथं येतं आम्ही वाजवत असलेला ढोल पाहण्यासाठीच. त्याच्यातल्या त्या साहस आणि आणि डोळयातल्या कारुण्याचं कारण एकच आहे... या ढोलावरच कातडं आहे त्याच्या जीवनसाथीच....!