जादूचा फुगा

एक खूप छान नाजूक परी मऊ रेशीम किरणांनी विणलेला सुंदर सोनेरी झगा घालून कपाळावर चांदणीची तिट लावून आपले मऊमऊ केस भुरूभुरू उडवत नाचत बागडत धरेवर येते, तेव्हा होत असते 'रम्य पहाट.'

तिच्या आगमनाने सारी धरा आनंदीत होते. एक नवी चेतना निर्माण होते. फुलपाखरे भुरूभुरू उडू लागतात. गार वारे परी बरोबर खेळ खेळू लागतात. झाडे, फुले आनंदाने डोलू लागातत. पक्षी आपल्या किलबिलाटाने तिचे स्वागत करतात. शेतात दूरवर पाखरांची मधुर शीळ कानी पडते. मोटेचा करकर आवाज कानी येवू लागतो. देवळात घंटानाद होऊ लागतो. सार्‍या धरेवर उत्साही वातावरण निर्माण होते. 

रानावनात-पाना फुलांत रेशमी किरणांचे जाळे पसरू लागते. धरेवर अवतरलेल्या परीच्या हातात असते 'एक दोरी.' दोरीला एक फुगा बांधलेला असतो. फुगा असतो जादूचा.

निळ्या घाटावर, लाल वाटेवर, हिरव्या डोंगरामागून आकाशात पूर्व दिशेला हा फुगा जेव्हा दिसतो तेव्हा अवघी पूर्व दिशा लाल-सोनेरी रंगांनी उजळून निघते. ती असते 'पहाट वेळ.'

हळुहळु अंधाराचे जाळे दूर होवू लागते. धरेवर कामसू सकाळ होते. माणसे आपापल्या कामाला लागतात. घरा-घरात सारी आवरा आवर सुरू होते.

काही वेळातच या फुग्याचा रंग बदलू लागतो. तो बनतो एक तापलेला गोळा, आकाशात तो मध्यावर येतो आणि धरेवरचे वातावर बदलून जाते. शांत, निवांत, सुस्त पेंगुळलेली दुपार होते.

पृथ्वीवर बागडणारी परी पश्चिमेची वाट धरते. हळुहळु फुग्याचा रंग बदलू लागतो. तो लाल-सोनेरी-केशरी होतो. रमत गमत संध्याकाळ धरेवर येवू लागते. पक्षी आपापल्या घरट्याकडे, माणसे घराकडे परतू लागतात.

सकाळी पूर्वेकडे, मध्यान्ही डोक्यावर असणारा हा जादूचा फुगा, सोन्याचा गोळा बनून पश्चिमेकडे गायब होतो.

पृथ्वीवर काळोख दाटू लागतो. भयाण शांततापसरू लागते. किर्रर्र रात्र होते. दिवसभर काम करून दमलेली माणसे विश्रांती घेऊ लागतात.

आभाळदेशात चांदणघाटावर चमचमाट होतो. पहाटेच्या लाल वाटा चंदेरी होतात. चंद्र-चांदण्यांने आकाश सजते.

आकाशातून धरेवर येणारी ही परी आपल्याकडील जादूच्या फुग्याच्या सहाय्ययाने धरेवर पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्र असे दिवसाच्या वेळेचे चक्र फिरवते. पहाटे लाल-सोनेरी-केशरी रंगाचा दिसणारा, आपल्या नाजूक रेशमी किरणांनी धरेवर नाजूक जाळे विणणारा, आपले सोनेरी दूत पक्षांच्या घरट्यांशी धाडणारा, दुपारी तप्त गोळा बनणारा, दाही दिशा प्रकाशाने भरून टाकणारा, सायंकाळी परत सोनेरी गोळा बनून, पश्चिमेकडे डोंगरा आड गडप होणार हा जादूचा फुगा म्हणजे आपल्या सर्वांना प्रकाश देणारा 'सूर्य' हे ओळखले असलेच.
 

वेबदुनिया वर वाचा