बोध कथा: कष्टाचे पैसे

शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (15:26 IST)
एक व्यापारी होता त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. तो खूप श्रीमंत होता. त्याला एकच मुलगा होता. त्याचे नाव होते गणेश. त्याला लाडाने गण्या म्हणत होते. तो फार आळशी होता. काहीही काम करीत नव्हता. तो तरुण झाल्यावर त्याचा वडिलांना फार काळजी लागली. त्याने गण्याला बोलविले आणि त्याला काही काम करायला सांगितलं. त्यासाठी त्यांनी अट ठेवली की तू काही कमवून आणल्यावरच तुला जेवायला मिळेल. 
गण्या आपल्या बहिणीकडे गेला आणि त्याने तिचा कडून पैसे मागितले. तो ते पैसे घेऊन आपल्या वडिलांकडे आला. त्याचा वडिलांनी ते पैसे विहिरीत फेकून दिले. दुसऱ्यादिवशी त्याने आपल्या आईकडून पैसे मागितले आणि वडिलांकडे घेऊन गेला. त्यांनी परत त्याकडून ते पैसे घेउन विहिरीत फेकून दिले. तिसऱ्या दिवशी तो कामाच्या शोधात घराच्या बाहेर पडला आणि काम शोधू लागला. त्याला हमालाचं काम मिळाले. त्याला दिवस भर मेहनत करून देखील फार कमी पैसे मिळाले. तो ते पैसे घेउन आपल्या वडिलांकडे गेला आणि दिले. त्याचे वडील त्याकडून पैसे घेऊन विहिरीत फेकून देतात. 
 
हे बघून गण्या फार चिडतो आणि आपल्या वडिलांना म्हणतो "की बाबा मी हे पैसे कमवायला किती मेहनत केली होती, मला हे कमवायला किती श्रम पडले आणि तुम्ही हे सरळ विहिरीत फेकून दिले." 
 
तेव्हा तो व्यापारी हसतो आणि त्याला म्हणतो की बाळ मला तुला हेच शिकवायचे होते की कष्टाने कमविल्या पैश्यांची काय किंमत असते. कदाचित आता तुला ह्याची जाणीव झालेली असणार. त्याला आपल्या वडिलांचे म्हणणे पटतं आणि तो वडिलांच्या व्यवसायाचा चांगल्यापणे सांभाळ करतो आणि वाढवतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती