अकबर बिरबल यांची मजेशीर गोष्ट : हिरवा घोडा

सोमवार, 7 डिसेंबर 2020 (13:07 IST)
एकदा बादशहा अकबरने बिरबलाची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यांनी बिरबलाला बोलाविले आणि म्हणाले 'बिरबल मला माझ्या घोड्याचा कंटाळा आलेला आहे. मला तेच ते रंग बघून वीट आला आहे. मला घोड्याचा रंग बदलून पाहिजे. बिरबलने विचारले की महाराज आपल्याला कोणत्या रंगाचा घोडा पाहिजे, मला सांगा मी आपणास मागवून देतो. त्यावर अकबर म्हणाले की मला काळा, पांढरा, पांढऱ्यावर काळे पट्टे किंवा काळ्यावर पांढरे पट्टे असलेला किंवा तपकिरी किंवा त्या तपकिरी  रंगात पांढरे पट्टे असलेला नेहमीच्या रंगांच्या व्यतिरिक्त रंग असलेला घोडा पाहिजे. तुला असं करणं जमत नसेल तर या पुढे मला आपले तोंड देखील दाखवू नको. 
 
बादशहाचे बोलणे ऐकून बिरबल म्हणाले 'की महाराज हे काम झालेच असं समजावं' मी आपल्या समोर लवकरच घोडा घेऊन येईन. असे म्हणून बिरबल निघून गेले. त्यांना बादशहा आपली परीक्षा घेत आहे हे लक्षात आलेलं असत. 
 
असेच तीन चार दिवस भटकंती करून बिरबल पुन्हा बादशहा समोर जातात. त्यांना बघून बादशहा विचारतात कुठे आहे माझा घोडा ? बिरबल म्हणे बादशहा हुजूर मी घोडा मिळवला आहे आणि तो हिरव्या रंगाचा आहे. मग तू आपल्या बरोबर का घेऊन आला नाहीस बादशहा विचारतात.

बिरबलने उत्तर दिले की हुजूर मी तो घोडा आणणारच होतो पण .. पण काय बादशहाने विचारले त्या घोड्याच्या मालकाच्या दोन अटी आहेत पहिली की ह्या घोड्याला नेण्यासाठी बादशहाने स्वतःच यावे आणि दुसरी .... दुसरी कोणती?  बिरबल म्हणाले की मालकाने सांगितले की बादशहाला इतर कोणत्याही रंगाच्या व्यतिरिक्त माझा हिरव्या रंगाचा घोडा पाहिजे, तर त्यांनी देखील रविवारपासून ते शनिवारपर्यंत हे वार सोडून इतर वारी यावं आणि आपल्या घोड्याला घेऊन जावं. बिरबलाचे हे उत्तर बघून आता मात्र बादशहाचा चेहऱ्याच्या रंगच उडाला होता. त्यांना बिरबलाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक वाटले आणि त्यांनी बिरबलाची खूप प्रशंसा केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती