अकबर-बिरबल कथा : मोठा माणूस होशील !

WD
जवळच्या गावात असलेल्या नातेवाइकांकडे आठ-दहा वर्षांचा महेशप्रसाद आपल्या ‍वडिलांसोबत जायला निघाला, म्हणून आई त्याला म्हणाली, बाळा जेवण करून जा. तेव्हा तो आईला म्हणाला, ''आई, मला बिलकुल भूक नाही आहे, तर जेवणात वेळ फुकट कशाला घालवू?'' नंतर महेश व त्याचे वडील परगावच्या रस्त्याला लागले. काही अंतर चालून गेल्यानंतर भुकेने महेशच्या पोटात कावळे ओरडायला लागले. इतक्यात रस्त्याच्या एक कडेला ब्रह्मदेवाचे मंदिर दिसले, म्हणून महेशचे वडील त्याला घेऊन मंदिरात गेले.

मंदिराच्या गाभार्‍यातील ब्रह्मदेवाच्या चतुर्मखी म्हणजे चार मुखे असलेल्या मूर्तीला वडील भक्तिभावाने नमस्कार करू लागले, तेव्हा भुकेने कासावीस झालेला महेश रडू लागला. हे बघून वडिलांनी त्याला विचारले, ''महेश, का रे बाळा असा का बर रडतोस आहे ?''

आई आपल्याला जेवण करून जा, असे सांगत असूनही आपण तिचे ऐकले नाही. आणि आता जर वडिलांना सांगितले, तर ते आपल्यास रागवतील, अशी भीती वाटून हजर जबाबी महेश वडिलांना म्हणाला, ''बाबा, मला एकच नाक आहे व सर्दी झाल्यानंतर ते वाहू लागले की, पुसून-पुसून नाकी नऊ येतात, तर मग या चार मुखे असलेल्या ब्रह्मदेवाला सर्दी झाली आणि याची चारही नाके एकाच वेळी वाहू लागली, तर याचे कशे हाल होत असतील? त्याच्या त्या वेळी होणार्‍या फक्त कल्पनेनेच मला रडायला येत आहे.''

आपला मुलगा का रडत आहे, हे माहीत असल्यामुळे त्याने सांगितलेली सबब ऐकताच वडील आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, ''बाळा, तू पुढे फार मोठा माणूस होशील.''

तसेच एकदा महेश सोळा वर्षांचा असताना एकटाच रानातील रस्त्याने परगावी चालला होता. इतक्यात एका झाडीतून एक वाघ बाहेर आला आणि त्याच्या अंगावर धावला. तेव्हा त्याच्याशी महेशने कडवी झुंज देऊन त्याला पळून जाण्‍यास भाग पाडले. तेव्हापासून अंगात वीराचे असलेल्या महेशला लोक मोठ्या प्रेमाने 'वीरबल' असे म्हणू लागले, आणि पुढे वीरबल म्हणता-म्हणता त्याचे नाव बिरबल झाले.

वेबदुनिया वर वाचा