सफर अद्भुत बोगद्यांची!

WD
निसर्गात अनेक चमत्कार आपण पाहतो पण युक्रेनमधील निसर्गाचा चमत्कार असाच अद्भुत तर आहे. युक्रेनमधील क्लेवेन नावाच्या शहराजवळ एका फायबरबोर्ड कारखान्यासाठी तीन कि.मी.चा एक खासगी रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गाच्या दुतर्फा असलेल्या झाडांनी आणि त्यावरील वेलींनी एका बोगद्याचा आकार घेतला आहे. झाडांच्या या बोगद्यातून ट्रेन दिवसातून तीन वेळा कारखान्यासाठी लाकडे घेऊन ये-जा करत असते. या बोगद्याला ‘टनेल ऑफ लव’ किंवा प्रेमाचा बोगदा असे म्हणतात. याचं कारण अनेक प्रेमी इथे येऊन मनातील इच्छा व्यक्त करतात. ही इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते.

असाच फुलांचा एक बोगदा जपानच्या किताक्यूशू शहरातील कवाची फूजी गार्डनमध्ये आहे. विस्टेरियाच्या फुलांनी तयार झालेला हा बोगदा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळते. विस्टेरिया रंगीबेरंगी फूल देणारी एक वेल आहे, या वेलीला पांढरी, गुलाबी, पिवळी, बैंगनी आणि लाल रंगाची फुले येतात. चीन आणि जपानमध्ये ही वेल खूप ठिकाणी आढळते. जपानमध्ये विस्टेरियाला फूजी म्हणता. कवाचीची ही बाग टोकियोपासून चार तासांच्या अंतरावर आहे. इथल्या बोगद्याचा आकारही नैसर्गिक आहे. अनेक वर्षानी या फुलांनी आपोआप बोगद्याचा आकार घेतला आहे. या बोगद्याचा फोटो कुणी पाहिला तर वास्तवात अशी काही रचना असेल यावर विश्वासच बसत नाही. लोकांना ते पेंटिंगच वाटते.

- जगदीश काळे

वेबदुनिया वर वाचा