रफू...

गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (11:39 IST)
एक मित्र भेटला परवा... 
खूप जुना... 
बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं... 
नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर... 
म्हणाला, "मुद्दामहून भेटायला आलोय तुला... हा योगायोग नाही... क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलंय."
 
सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन... सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो...
अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजुला सारता आला नाही... तेव्हढा वेळच नाही मिळाला. 
विचारलं मी त्याला अचानक ऊपरती होण्यामागचं कारण... चेहऱ्यावर शक्य तेव्हढा 'आलासच ना अखेरीस' हा माज ठेऊन. 
 
तो मला म्हणाला, 
"दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली... 
काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास... 
ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं... 
आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता... 
वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली... 
त्यानंतर तू मला तोडलस ते कायमचंच... 
मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षुन... 
तू त्यावेळी मला म्हणाला होतास, 'देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो'... 
ती वेळ माझ्यावर आली... दोन महिन्यांपुर्वी... 
नाही शिवू शकलो मी ते भोक... 
नाही करु शकलो रफू... 
नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा आेतून ते एक छीद्र... 
माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं...! 
गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दुषणं देत... 
'कसला बाप तू?' अशी खिल्ली ऊडवत बहुदा मनातल्या मनात...  
म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे... 
आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला... 
यावेळी तू आपलं नातं 'रफू' केलेलं पहायला... 
त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून रडायला". 
 
सुन्न होऊन ऐकत होतो मी... 
संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठ अंगण मिळतं बागडायला... 
'देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो', चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता. 
घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना... नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे. 
'तो' त्याने नकळत केलेल्या 'पापातून' अन् 'मी' नकळत दिलेल्या 'शापातून' ऊतराई होऊ बघत होतो... 
मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो... 
दोघं मिळून एक नातं, नव्याने 'रफू' करू पाहत होतो!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती