कोण म्हणतं मोबाईल मुळे प्रेम कमी झालंय???
सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (13:17 IST)
'रिमाईंडर' आबांना सांगतो, अन्
'आजही यांना माझ्या
सगळ्या गोष्टी लक्षात राहतात'
असं आजी मैत्रिणींना सांगताना
तो मोबाईल मधला स्मायली
आबांना डोळा मारतो...
'युट्युब' आजीला
शिळ्या पोळीचा पिझ्झा
कसा करायचा ते सांगतं अन्
'आमची ही मुळातच सुगरण आहे'
ही कमेंट मात्र
आजीला मिळून जाते...
दूर राहणाऱ्या नातीचं
ते दातपडकं हसू आजोबा रोज
व्हिडीओ कॉल वर पाहतात
आणि हळूच आपले
उरलेले दात मोजतात...
आता खरेदीसाठी आजी
बाहेर न पडता
मोबाईलवरच साड्या बघते
पण आजही
TV बघत असलेल्या नवऱ्याला
'आहो, रंग कसा आहे?'
हे नक्की विचारते...
प्रत्यक्षात 'सुमी' ला
न देऊ शकलेलं गुलाबाचं फुलं
आजोबा रोज
शाळेच्या ग्रुप वर पाठवतात,
आणि तिचा 'लाईक' आला की
तिच्या लाडक्या जुईच्या फुलांचे फोटो
गुगल करायला लागतात...
आजीने डीपी बदलला की
'सुंदर' अशी कमेंट करणाऱ्या
त्या आजीच्या मित्राला
आजोबांना ब्लॉक करायचं असतं,
पण कसं ब्लॉक करायचं
ते माहिती नसल्याने
आजीला पण ग्रुपवर
चमेलीचं फूल येत असतं...
'भेंडी चिरायच्या आधी धुवायची
की नंतर?' या प्रश्नांना पण
प्रेमळ उत्तर दिल्यामुळे
फेसबुक वर आता आजी
'खाना खजाना' ग्रुपवर
भलतीच प्रसिद्ध झालीये...
अन् व्हाट्सएप वरचे जोक
फेसबुक वर टाकून
लोकांना खुश करतांना
आजोबांची स्वारी पण
फॉर्मात आलीये...
आजीने एक गुलाब जामुन खाल्ला
तर आजोबा तिला
'वाढत्या वयात डायबेटीज चा धोका'
हा लेख फॉरवर्ड करतात,
अन् आजीचा राग शांत करण्यासाठी
दिलीप कुमारची गाणी लावतात...
वहिदा रेहमान च्या वाढदिवसाला
आजोबा फेसबुकवर
तिच्यावर लेख लिहतात अन्
तिच्या फोटोवर चुकून
आजीलाच टॅग करतात,
मग आजी पण हसून
त्याला लाईक देते अन्
रात्री जेवणात मुगाची खिचडी करते...
आता फिरायला गेलं
की दोघे सेल्फी काढतात,
कुणाचा मोबाईल
आधी चार्ज करायचा यावर भांडतात,
आणि ग्रेसांच्या कविता
मेसेजमधून एकमेकांना पाठवतात...
मोबाईल मुळे प्रेम कमी झालं नसून
प्रेमाची व्याख्या बदलली आहे...
कारण
पूर्वी पाकिटात असणारा
आजीचा फोटो आता
आबांचा वॉलपेपर आहे...!