चिमुटभर आनंद

सकाळी सकाळी एकीने चिमुटभर आनंद दिला. नियमित फिरायला येणारी ती, रोज समोरून जायची. ओळखपाळख काहीच नाही. फक्त एकाच ट्रँकवर फिरायचो म्हणुन ट्रँकमेट असलेली. कधी एकमेकींकडे लक्ष जायचे तर कधी आपआपल्या विचारात नुसतेच समोरून जाणे व्हायचे. पण आज काय झाले कोणास ठाऊक? ती छान ओळखीचं हसली अन् मीही प्रतिक्षिप्त क्रियेने परतीचं हसले. पुढे येईपर्यंत काय झाले ते नीटसं कळालं आणि छान वाटलं. माझी सकाळ प्रसन्न झाली. 
 
लेकीला छान गोड चहा आवडतो. मी आपला नेहमीसारखा चहा करते. परवा सहजच तिची आवड लक्षात आली म्हणुन चमचाभर साखर जास्त टाकली चहात. कित्ती आनंद झाला तिला. तिच्यामाझ्या त्या चिमुटभर आनंदाने मलाही छान वाटले. 
 
भाजी, फळं घेतानां वजनापेक्षा थो..डं जास्त मिळालं तरी असा आनंद होतो. 
 
बहीणभावाने, मैत्रिणीने, काही काम नसतानां सहजच एक फोन केला तरी चिमुटभर आनंद होतो.
 
नवीनच लावलेल्या मोगरयाला मस्त फुलं आली अन् वासही छान दरवळला, खुप दिवस वाचायचं असं मनात असलेलं पुस्तक लायब्ररीत सहज मिळालं, आकाशवाणीवर आपल्या आवडीचं पण विस्मरणात गेलेलं गाणं लागलं, आवडीच्या व लेखनात अधिकार असलेल्या लोकांनी आपल्या लेखनाला छान दाद दिली, की खुप छान वाटतं. 
 
असे चिमुट चिमुट भर आनंद खुप असतात. ते पकडता येतात. स्वतःला तशी सवय लावुन घेतली की सोपं होतं. मुड छान रहाण्यासाठी, छान जगण्यासाठी ही गंमत ओळखता आली की मनाचं फुलपाखरू  सगळीकडचा कण कण आनंद गोळा करत मस्त भिरभिरत रहातं.
 
असेच चिमुट भर आनंद जीवन समृध्द करतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती