तिला ना सगळंच हवं असतं सगळंच करायचं असतं मनापासून मन लावून..
तिला सगळ्याची भारी हौस.. खाण्याची- खिलवण्याची, गाण्याची- कवितेची, फिरण्याची भटकंतीची आणि शांत गझल ऐकण्याची..
तिला आवड आहे जगण्याची- समरसून , भरभरून
बरोबर ना ?
खरेदी म्हणजे तर तिचा श्वास ! मग विंडो शोपिंग पण चालतं.. मूड ठीक करायला खरेदी हा एकमेव उपाय..
संदिप खरे असो किंवा अरूण दाते, आशा भोसले तर वाह.. जगजित ची गझ़ल तर ती ऐकतेच ऐकते आणि उडत्या गाण्यावर ठेका पण धरते..
लावणी पण निषिद्ध नाही आणि अभंग ही वर्ज्य नाही..
बाहेरचं जग पण तिला खुणावतं, त्याच बरोबर घराकडे तिचं दुर्लक्ष नाही..
कर्तव्यात कणभर कसूर नाही..
जसा प्रसंग तसा तिचा वेष आणि वागणं.. पूजेला साडी आणि डान्स करताना मिडी , यात तिला वावगं वाटत नाही.. सर्व प्रकारची मजा तिला आवडते, सर्व अनुभव तिला घ्यायची इच्छा आहे..
तिला घर पण सांभाळायचं आहे, मुलांकडे लक्ष द्यायचं आहे, घरातल्या इतर गोष्टीत तिला रस आहे.. आणि त्याच बरोबर तिला स्वतः ची आवड,ऋची पण जपायची आहे.. छंदात मन रमवायचं आहे, काही तरी नवीन, धाडसी करायचं आहे.. सगळ्यांच्या नजरेत स्वतः ला सिद्ध करायचं आहे.. स्वतः चं अस्तित्व तिला खुणावतं आहे..
समाजाचं ऋण फेडण्यासाठी श्रम करायची तयारी आहे, स्वतः ची कला जोपासण्यासाठी ती उत्सुक आहे..
केवळ वाहवा मिळवण्यासाठी नव्हे, तर एका कौतुकाच्या शब्दासाठी, तिची सारी धडपड आहे..
तिला जगण्याची आवड आहे, स्वत्व जगण्याची ओढ आहे, मित्र मैत्रिणीमधे रमण्याची आस आहे,
फक्त तिला एक खंबीर साथ हवी आहे, मूक संमती हवी आहे, तिच्या पंखात बळ भरणारी, तिच्या सोबत असणारी प्रेमळ संगत हवी आहे....