घट्ट मैत्रीची रेसिपी...

साहित्य : 
एक चमचा भरून ओळख, आयुष्याभर पुरेल एव्हढे निखळ मैत्रीचे नाते, तेव्हढाच विश्वास, हृदय भरून प्रेम, चवीपुरती भावना, चिमूटभर रुसवा-फुगवा, मैत्री घट्ट होण्यासाठी आदर किंवा सन्मान, मैत्री सजण्यासाठी गोड हसू. 
 
कृती : 
 
मनामध्ये थोडीशी ओळख घालून ती नीट समजावून घ्या. 
 
त्यात निखळ मैत्रीचे नातं घालून ते नीट एकत्र करा. 
 
अर्थात ओळख असल्याशिवाय मैत्रीला स्वाद येणारच नाही. 
 
ओळख व मैत्रीचं नातं छान एकत्र झालं की त्यात चवीपुरती भावना, प्रेम व विश्वास घालून पुन्हा एकत्र करा. 
 
या मिश्रणाला प्रेमाचा एक वेगळाच रंग येईल आणि विश्वासाने मैत्री अधिकच चवदार होईल.
 
या मिश्रणात चिमूटभर रुसवा-फुगवा घालून पुन्हा एकदा एकजीव करा.
 
मैत्री अधिक रुचकर होण्यासाठी त्यात चिमुटभर का होईना पण रुसवा-फुगवा हवाच, त्याशिवाय मजा येत नाही. हा रुसवा-फुगवा मैत्रीत विरघळून जाईल तेंव्हाच मैत्रीला खरी चव येईल. 
 
आता ही मैत्री अधिक घट्ट व्हावी असे वाटत असेल तर त्यात आदर-सन्मान मिसळा व एकजीव करा. 
 
आता ही मैत्रीची डिश सजवण्यासाठी त्यावर गोड गोड हसूं पसरा आणि प्रत्येकाला या घट्ट मैत्रीची चव चाखायला द्या. 
 
ही घट्ट मैत्री आयुष्यभर छान टिकते. 
 
प्रत्येकाने या घट्ट मैत्रीची मेजवानी केलीच पाहिजे! 

वेबदुनिया वर वाचा