या दिवाळीत सारं घर झाडूनपुसून लख्खं केलं, माळे काढले. नकोशा वस्तू काढून टाकल्या. काहीत रुतल्या होत्या आठवणी. त्या हातात धरून पाहिल्या.पण नको आता ही अडगळ, काय उपयोग म्हणून सरळ भंगारमधे दिल्या. जुने कपडे, मोडकी भांडी, तुटक्या खुर्च्या, विरले पडदे, फाटके अभ्रे. नकोत आता असं बजावलंत ना स्वत:ला. आणि ते बाहेर काढून जरा मोकळी केली जागा. आणि नवीन काही घेऊ तेव्हा घेऊ पण आता जुन्याची अडगळ नको. पसारा नको. आणि हा हावरटपणाही नको. नाही नाही ते जमवण्याचा. त्यानंतर कसं सारं स्वच्छ, मोकळं. आणि सुटं झालं.
बदल्याची भावना,
सूडाची आग...
हे सारं आपण काढून टाकू शकू मनातून या दिवाळीला?मोकळी करू जरा जागा...नव्या आनंदासाठी? जुनाच पसारा तसाच ठेवला तर नव्या गोष्टींना जागा कशी व्हायची? नव्या माणसांना प्रवेश कसा मिळायचा? आणि आपल्याला तरी हलकं,फ्रेश, ताजतवानं कसं वाटायचं?
म्हणून वाटतंय की, या दिवाळीत एवढं करूच. जरा मन आवरायला घेऊ.
अडगळ काढून टाकू. रडून घेऊ वाटलं तर! म्हणजे त्या पाण्यात स्वच्छ होतील... काही आठवणी. बोलू मनापासून आपल्या जिवाभावाच्या माणसांशी.
एफबी आणि व्हॉट्सअॅपवर उधानउसनवारीच्या स्मायली नको. प्रत्यक्ष बोलू,. खांद्यावर डोकं ठेवून. काय ते सांगून मोकळे होऊ. राग-संताप असेल तर तो सांगू. प्रेम असेल तर तेही सांगू. पण जरा बोलूच. कशाला उगीच जिवाला जाळायचं? कशाला काजळी धरून द्यायची मनावर? कशाला हवी उदास मेणचट वारूळं? आणि कशाला उगीच धरून बसायच्या छोट्याछोट्या गोष्टी? या दिवाळीत विचारू ना हे प्रश्न स्वत:ला? आणि लख्खं उजळवून टाकू मन.... आपलंच. आपल्यासाठी! आपणच!