पूर्ण नाव: थॉमस रेमन मूडी जन्म: 2 ऑक्टोबर, 1965 ला ऑस्ट्रेलियामध्ये एडलेड येथे झाला.
माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मुडीने श्रीलंका संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. क्रिकेटबरोबर उंच उडीमध्येही ते निष्णात होते. पर्थमध्ये शालेय शिक्षण घेत असताना आपल्या वडिलांमुळे त्यांना खेळाबद्दल आवड निर्माण झाली. त्यांचे वडील शाळेचे मुख्याध्यापक होते.
लहानपणी त्यांना फुटबॉलची आवड होती. परंतु, तेरा वर्षांचे असतानाच क्रिकेट संघात त्यांची निवड झाली. त्यानंतर शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पश्चिम ऑस्ट्रलिया क्रिकेट संघाच्या मीडलंड गुलफोर्ड संघाकडून क्रिकेट खेळायला सुरवात केली होती.
सहा फूट सहा इंच असलेल्या मुडींना त्यांचे सहकारी 'लॉंग' या नावाने पुकारत होते. प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळण्यास 1985-86 मध्ये त्यांनी सुरवात केली होती. पश्चिम ऑस्ट्रेलियात शेफील्ड शील्ड आणि इंग्लंडमध्ये वॉर्कविकशायर व वूस्टरशायरकडून खेळ केला. प्रथम श्रेणीच्या क्रिकेट सामन्यात 20000 धावा आणि 64 शतके मूडीच्या नावावर आहेत. 1989 ते 1992 च्या दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी ते आठ कसोटी सामने खेळले. याशिवाय तीन विश्वकरंडक सामने खेळले आहेत.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर 2005 मध्ये ग्रेग चॅपेलच्या अगोदर मूडीला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनविण्याचा विचार चालू होता. त्यानंतर काही दिवसातच ते श्रीलंका संघाचे प्रशिक्षक बनले. 2007 च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदाचा त्यांनी राजीनामा दिला.