चौदा ऑगष्टच्या रात्री दिल्लीत घटना सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले भाषण..... पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पूर्ण किंवा शक्य तेवढी. मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना भारताच्या नसानसात मात्र चैतन्य संचारेल. स्वातंत्र्यप्राप्ती होईल. जुन्याला सोडचिठ्ठी देऊन नव्या आयुष्यात पाऊल टाकतानाचे, एका युगाचा शेवट होत असतानाचे आणि पिचलेले राष्ट्र स्वतःचा उद्धार करतानाचे, असे क्षण इतिहासात खूप कमी वेळा ये
ND
ND
तात. या महत्त्वपूर्ण क्षणी आपण भारत, भारतवासीय आणि मानवतेच्या हितासाठी झटण्याची शपथ घेणे योग्य ठरेल.
इतिहासाच्या उषःकालात भारताने स्वतःच्या शोधास अनंतात प्रारंभ केला. या काळातील अनेक शतके या देशाचे कर्तृत्व, त्याचे यशापयश यांनी भरलेली आहेत. भलेबुरे दिवस येत जात राहिले पण या देशाने आपले स्वत्व शोधण्याचे ध्येय डोळ्यांपुढून हलू दिले नाही. ही शक्ती देणारे आदर्शही तो विसरला नाही. आज आम्ही दुर्भाग्याच्या एका कालखंडावर पडदा पाडतो आहोत. भारताला अखेर स्वत्वाची ओळख झाली आहे. आज आम्ही साजरा करत असलेला आनंदोत्सव म्हणजे आगामी काळात आणखी कीर्ति आणि विजय मिळविण्यासाठी टाकलेले केवळ एक पाऊल आहे. असा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी यापुढेही मिळणार आहेत. ही संधी साधण्यासाठी आणि भविष्याचे आव्हान स्वीकारण्यासाठी आमच्यात तेवढे धाडस आणि बुद्धिकौशल्य आहे?
स्वातंत्र्य व शक्तीच्या बरोबरच जबाबदारीही वाढते. भारतीयांचे प्रतिनिधित्व करणार्या या सभेवर ही जबाबदारी आहे. स्वातंत्र्याच्या जन्मापूर्वी आपण सर्व प्रसववेदना सहन केल्या. त्याच्या स्मृती हृदयात जतन करून ठेवल्या आहेत. यातील काही वेदनांची ठसठस आजही होतेय, पण तरीही भूतकाळ संपून भविष्याचे आव्हान आपल्यासमोर आहे हेही विसरता कामा नये.
हे भविष्य आरामात घालवण्यासाठी वा विश्रांती घेण्यासाठी नाही. आतापर्यंत आपण जे संकल्प केले आणि आजही करत आहोत, त्यांना पूर्ण करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहण्यासाठी आहे. भारताची सेवा म्हणजे कोट्यवधी दीनदलितांची सेवा आहे. याचा अर्थ दारिद्र्य, अज्ञान व संधीची विषमता आपल्याला संपवावी लागणार आहे. प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू पुसले पाहिजेत, अशी आमच्या पिढीतील सर्वांत मोठ्या व्यक्तीची आकांक्षा आहे. कदाचित हे आपल्या क्षमतेपलिकडील असेल. पण जोपर्यंत अश्रू आहेत, दुःख आहेत, तोपर्यंत आपले काम पूर्ण होणार नाही.
आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच आम्हाला काम करायचे आहे. परीश्रम घ्यायचे आहेत. ही स्वप्ने केवळ भारताची नसून वैश्विक आहेत. वैश्विक वातावरणात देश व नागरिकांची वीण परस्परांशी इतकी जुळलेली आहे की तिला अलिप्त करता येणार नाही. शांततेच्या संदर्भात असे म्हटले जाते की तिचे विभाजन करता येत नाही. स्वातंत्र्याचेही आणि आता समृद्धीचेही तसेच आहे. इतकेच काय पण संकटांनाही विभक्त करता येत नाही.
ज्या भारतीयांचे आम्ही प्रतिनिधित्व करतो, त्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आमच्या पाठिशी विश्वासाने आणि निश्चयपूर्वक उभे रहावे. कुणावरही फुटकळ आणि विखारी टीकेची ही वेळ नाही. त्याचवेळी दुसऱ्यांवर आरोप करण्याची सुद्धा ही वेळ नाही. आपली आगामी पिढी सुखासमाधानाने राहू शकेल अशा बलाढ्य व विशाल भारताची इमारत आपल्याला उभारायची आहे.
महोदय, मला हा प्रस्ताव मांडण्याची परवानगी द्यावी -
हे मनाशी पक्के ठरवा
1. मध्यरात्रीचे टोले पडल्यानंतर याप्रसंगी उपस्थित घटना सभेच्या सदस्यांनी अशी शपथ द्यावी की- 'तमाम भारतीयांनी हाल अपेष्टा अणि त्यागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या या पवित्र क्षणी, मी भारतीय घटना सभेचा सदस्य, भारत व भारतवासीयांच्या सेवेसाठी स्वत:स अर्पित करत असून, प्राचीन परंपरा लाभलेल्या या पावन भूमीची प्रतिष्ठा व वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी त्याचबरोबर जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवी कल्याण साधण्यासाठी मी सर्वतोपरी आपले योगदान देण्यास कटिबद्द आहे'
2. जे सदस्य यावेळी उपस्थित नाहीत. ते पुढील वेळी या अधिवेशनात उपस्थित असतील त्यावेळी त्यांनी ही शपथ घ्यावी. (सभापतींनी निश्चित केलेल्या काही शाब्दिक बदलासह)
(प्रकाशन विभागाकडून प्रकाशित 'जवाहरलाल नेहरू के भाषण' या पुस्तकातून साभार )