राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥१॥
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसते लाली तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥२॥
मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदती जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥३॥
हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण तुज सकल चराचर शरण, श्री स्वतंत्रते वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥४॥