अगस्ता हे नाव अगस्ती मुनींवरून या झाडाला पडले आहे. या झाडाचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे झाड फार लवकर मोठे होते व लवकर वाळू लागते. अगस्त्याला येणाऱ्या फुलांची भाजी आरोग्यपूर्ण आहार आहे.
लहान मुलांचा कफ कमी करण्यासाठी : अगस्त्याच्या फुलांची भाजी करून ती लहान मुलांना खायला द्यावी. ह्याचा मुख्य उपयोग लहान मुलांचा कफ कमी करण्यास होतो. तसेच कफ सर्दी खोकला जावा म्हणून अगस्त्याचा पानांचा रस चार थेंब, त्यात चार थेंब मध घालून मुलांना चाटवावा. कफाचे पाणी होऊन घसा साफ होतो.
लहान मुलांचे पोटाचे विकार कमी करण्यासाठी : अगस्त्याच्या पानांचा रस मधातून चाटवला असता लहान मुलांचे पोटातील कोणतेही विकार बरे होऊ शकतात. या पानांची रसशक्ती चांगली असते म्हणूनच खूप रस निघाला तर पाव चमचा द्यावा.
शौचास साफ होण्यासाठी : आगस्त्याच्या पानांचा रस घेतला असता शौचाला दोन चार वेळा जायला लागून पोट साफ होऊन पोटातील विकार हलका होतो.
सर्दी व डोके दुखीवर : पडसे दाटून असेल व डोके फार दुखत असल्यास अगस्त्याच्या पानांचा रस दोन थेंब नाकात टाकावा. त्यामुळे पडसे वाहून जाऊन नाक साफ होते आणि डोके दुखायचे थांबते.
हिवतापावर तसेच मुदतीच्या तापावर : हिवताप विशेष करून चौथारा म्हणजेच चार दिवसांच्या मदतीने येणाऱ्या तापावर तसेच हुडहुडी भरून येणाऱ्या तापावर वा हिंवावर अगस्त्याच्या पानांची रस शक्ती पाहून पाव चमचा रस नाकात ओढल्यास मुदतीचा ताप उतरतो. हिंवताप कमी होतो.
अर्धशिशीवर रामबाण : अगस्त्याच्या पानांच्या रसाचे थेंब हुंगल्याने अर्धशीशी पूर्ण बरी होते.
कफनाशक : छातीतील कफ पातळ व्हावा व तो पडून जावा म्हणून अगस्त्याच्या मूळीचे चूर्ण 3 ग्रॅम घ्यावे. ते पाण्यात मिसळून पोटात घेतले असता छातीतील कफ पातळ होऊन पडतो.
श्वसन विकारात : दमा तसेच श्वसन विकारात अगस्त्याच्या पानांचा रस हुंगला असता श्वासातील अडथळा दूर होऊन आराम पडतो.
अशा प्रकारे अगस्ता ही एक अत्यंत उपयुक्त अशी औषधी वनस्पती आहे.