बहुगुणी अडुळसा…

सोमवार, 18 जून 2018 (19:25 IST)
कफावर, विशेषकरून फार दिवस येणाऱ्या खोकल्यावर व ज्यात बारीक तापही येतो अशा खोकल्यावर अडुळशाइतके रामबाण औषध नाही. अडुळसा हे उत्तम सर्वमान्य औषध आहे. 10 ग्रॅम अडुळशाच्या पानांचा रस, 10 ग्रॅम मध व 1/2 ग्रॅम पिंपळीचे चूर्ण एकत्र करून त्याचे चाटण करावे. हे चाटण वरचेवर घेतले असता कफजन्य विकार तसेच खोकला बरा होतो. कफ पडतो, घसा साफ होतो व बरे वाटते.
 
खोकला येत असून ताप येत असेल तर अडुळशाचे रसाने कमी होतो. खोकल्यावर अडुळशाचा अवलेह देतात. अडुळसा, ज्येष्ठमध, बेहडा, हळकुंड व फुलवलेला टाकणखर सारख्या प्रमाणात घेऊन मिश्रण करून ठेवावे हे चूर्ण मोठ्या माणसाने दोन ग्रॅम व लहानानी एक ग्रॅम मधाबरोबर आठवडावर घेणे. खोकला बरा होतो. टाकणखार नसेल तर साखर घ्यावी.
 
श्‍वास विकारावर : श्‍वासावरील विकारात वरीलप्रमाणेच अडुळशाचा रस मध आणि पिंपळी यांचे चाटण अत्यंत उपयुक्‍त ठरते. त्यामुळे श्‍वास विकार बरा होण्यास मदत होते. श्‍वास कमी होतो.
 
रक्‍तपित्तावर : रक्तपित्त म्हणजे नाकातून अथवा तोंडातून रक्त येत असल्यास अडुळसा द्यावा. 10 मि. लि. अडुळशाचा रस व तितकीच खडीसाखर घालून द्यावा, रक्त पडण्याचे कमी होते.अडुळशाच्या पानांचा डोक्‍यावर लेप घातला असता नाकातून वाहणारे रक्त बंद होते.
 
स्त्रियांच्या प्रदरावर : प्रदरावर अडुळशाचा रस 10 मि.लि. व खडीसाखर 10 ग्रॅम, रोज तीन वेळा घ्यावी. म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रदरावर म्हणजे अंगावरून पांढरे जाणे, अंगावरून पाणी जाणे, पाळीच्या स्त्रावात दुर्गंधी तसेच अतिस्त्राव किंवा कमी स्त्राव, गुठळ्या पडणे. या सर्व विकारात अडुळशा महत्वाचे औषध ठरते. स्त्रीयांचे सर्व प्रकारचे प्रदर अडुळसा बरा करतो.
 
देवीच्या साथीवर : गावात देवीची साथ आली असता ज्या मुलांस देवी आल्या नाहीत किंवा टोचल्या नाहीत, त्यास अडुळशाच्या पानांचा व ज्येष्ठमधाचा काढा रोज एक वेळ दिला असता देवी येण्याची भीती कमी होते. तो घेतल्याने देवीपासून भीती कमी रहाते.
 
क्षय रोगावर : क्षय रोगावर औषध करताना काढ्यात अडुळशाचे एक पान व एक लहान ज्येष्ठमधाचा तुकडा (सुमारे तीन ग्रॅम) घालून पाव लिटर पाणी घालावे व अष्टमांश काढा करून घ्यावा. हा काढा क्षयरोगावर उत्तम समजला जातो. तेव्हा ज्या गावात अडुळशाचे झाड आहे. त्या गावात क्षयी इसमास मरणास भिण्याचे कारण नाही. क्षय झाला असता अडुळशाचा अवलेह देतात.
 
दमेकरींना औषधी : अडुळसा कफनाशक आहे. अडुळशाच्या पानांच्या विड्या करून त्या ओढल्या असता छातीतील कफ पातळ होऊन दमेकरी मनुष्यास फार सुखावह वाटते.
जखमेवर किंवा व्रणावर : अडुळशाची पाने बारीक वाटून ती जखमेवर बांधली असता जखम भरून येते.
 
डोकेदुखीवर : डोकेदुखी जडली असता डोक्‍यावर अडुळशाच्या पानांचा लेप केला असता, डोकेदुखी पूर्णपणे थांबते . अडुळशाच्या पानांचा नुसता रस निघत नाही. पाने शेकून रस काढला तर चांगला निघतो.
 
जीर्णज्वरावर : जीर्णज्वर झाला असता अडुळशाचा लेह देतात.
 
अडुळसा अवलेह : एक लिटर अडुळशाचा रस घेऊन त्यात त्याचे चतुर्थांश म्हणजे पाव किलो साखर घालावी व मंदाग्नीवर ठेवावा. रसास चांगली तार आली म्हणजे उतरून खाली ठेवावा. थोडा गार झाल्यावर त्या रसाच्या निमपट म्हणजे रसाचे निम्मे अर्थात्‌ अर्धा लिटर मध व पाव किलो साखरेच्या निम्मे 100 ग्रॅम पिंपळी घालून सर्व मिश्रण बरणीत भरून ठेवावे. आणि मग काही दिवसांनी हा अवलेह मुरू लागतो. तो लेह मुरला म्हणजे औषध म्हणून उपयोगात आणावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती