डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी...

रविवार, 1 जुलै 2018 (00:28 IST)
रडल्यामुळे डोळ्यांच्या आसपास तरल पदार्थ एकत्र होतात त्यामुळे डोळे सुजतात. वास्तविक सातत्याने रडणे आरोग्यासाठी चांगले नसते. कारण त्यामुळे तणाव वाढतो. डोळ्यातील लेक्रिमल ग्लँडस्‌ अश्रूंची निर्मिती करतात. याचे मुख्य कार्य म्हणजे अश्रूंच्या मदतीने डोळ्यांना होणार्‍या संसर्गापासून संरक्षण करणे. पण जेव्हा आपण रडतो तेव्हा या ग्रंथी अतिकार्यशील होतात त्यामुळे सतत अश्रू येतात. हळूहळू डोळ्यांच्या भोवती तरल पदार्थ जमा होतो. त्यामुळे सूज येते. डोळे लाल होऊन डोळ्यांची जळजळ होते. अशात घरगुती उपायांनी डोळ्यांची सूज कमी होऊ शकते. 
 
हलका मसाज केल्यानेडोळ्याची सूज कमी होते. त्यासाठी हाताला नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह तेल यांचे काही थेंब घ्या आणि हलक्या हाताने मसाज करावा. मालिश केल्यानंतर थोडा वेळ झोपावे आणि डोळे बंद ठेवावेत. दोन तीन वेळा असे केल्यास डोळ्याची सूज कमी होते. 
 
थंड शेक घ्या : डोळ्यांना आराम मिळावा यासाठी सर्वात सोपा आणि चांगला उपाय म्हणजे कोल्ड कॉम्प्रेस किंवा थंड शेक घेणे. थंड शेक घेतल्याने डोळ्यांच्या आसपासची त्वचा घट्ट होते त्यामुळे सूज दूर होते. त्यामुळे खूप आराम मिळतो. यासाठी एक सुती रुमाल किंवा सुती कपडा घेऊन पाण्यात भिजवावा आणि पिळून डोळ्यांवर ठेवावा. पाच पाच मिनिटांच्या अंतराने डोळ्यावरून काढावे आणि पुन्हा पाण्यात भिजवून आणि पिळून ठेवावे. जवळपास 10 ते 12 मिनिटांपर्यंत हा प्रयोग केल्यास डोळ्यांना खूप आराम मिळतो. दिवसातून दोन तीन वेळा असा शेक घ्यावा. 
 
काकडीचे फायदे : सूज आणि जळजळ होत असेल तर काकडी हा उत्तम उपाय. काकडीचा रस डोळ्यांना थंडावा देतो. त्यातील अ‍ॅस्ट्रीजंट गुणधर्म सूज घटवण्याचे काम करतात. त्यासाठी काकडीच्या चकत्या डोळ्यावर ठेवा. काकडीचा थंडपणा कमी होतो आहे असे लक्षात आले की त्या काढून दुसर्‍या चकत्या ठेवा. डोळ्यांसाठी वापरत असल्याने काकडी कापण्यापूर्वी ती धुवून घ्यावी. नंतर कोमट पाण्याने डोळे धुवून टाकावे. 
 
* साध्या पाण्याने डोळे धुतल्यास आराम मिळू शकतो. * सूज दूर करण्यासाठी टी बॅगचा वापर करता येईल. ब्लॅक टी बॅग मध्ये टॅनिन नावाचा घटक असतो. त्यामुळे डोळ्यांच्या त्वचेत प्रवेश करून सूज दूर करण्यास मदत होते. यासाठी दोन टी बॅग गरम पाण्यात उकळवा आणि थंड होऊ द्या. नंतर त्या डोळ्यांवर ठेवाव्या आणि 10 मिनिटे आराम करावा. दिवसातून दोन वेळा असे केल्यास फायदा होतो. * सूज दूर करण्यासाठी मिठाच पाणी फायदेशीर ठरते. डोळ्याच्या आसपास साठणारा तरल पदार्थ शोषून घेण्यात या मिठाची मदत होते. यासाठी कोमट पाण्यात 2 चमचे मीठ मिसळावे. मीठ पूर्णपणे विरघळले की त्या पाण्याने डोळे धुवावेत.
साभार : डॉ. मनोज शिंगाडे 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती