स्नान कधी करावे?

तज्ज्ञांच्या मते तेलकट त्वचेच्या लोकांनी सकाळी स्नान केल्यास फायदा होतो आणि त्यांची त्वचा उत्तम राहाते. पुरुषांनी सकाळी आंघोळीनंतर दाढी करणे उत्तम. कारण आंघोळीनंतर त्वचा मऊ होते. त्यामुळे दाढी चांगली होते. जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांनी सकाळीच आंघोळ करावी. काही लोकांना संध्याकाळी आंघोळ केल्यास बरे वाटते. मात्र काही संशोधकांच्या मते, रात्री आंघोळ केल्यास शरीराच्या तापमानात बदल होतो त्यामुळे शरीराचे निसर्गचक्र बाधित होते. त्यामुळे झोप लागण्यात अडथळा निर्माण होतो. अशी समस्या असल्यास झोपण्यापूर्वी 2 तास आधी आंघोळ करावी. 
 
त्वचेला सनस्क्रीन लोशन लावत असाल, मेकअप आदींचा वापर करत असाल तर रात्री आंघोळ करावी. त्यामुळे लोशन, मेकअप आदी निघून जाण्यास मदत होईल. रुग्णालये, बांधकाम साईट आदींवर काम करत असाल अथवा सातत्याने धूळ, प्रदूषण आणि घाण यांच्या संपर्कात राहात असाल तर रात्री जरुर आंघोळ केली पाहिजे. रात्री किंवा दिवसा आंघोळ करण्याचा निर्णय वैयक्तिक असला तरीही आपल्या शरीर आणि दैनंदिनीचा विचार करून याबाबतचा निर्णय घ्यावा. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
थंड की कोमट : सकाळी आंघोळ करणे आवडत असेल तर थंड पाण्याने आंघोळ करावी. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते. रात्री आंघोळ करत असाल तर हलक्या कोमट पाण्याने स्नान करावे. असे केल्याने दिवसभर थकलेल्या शरीराला आराम मिळतो आणि गाढ झोप लागते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती