Cerebral Palsy Day सेरेब्रल पाल्सीचा धोका 'या' गोष्टींमुळे वाढतो, वाचा या आजाराबद्दल

शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (11:06 IST)
आज (6 ऑक्टोबर) सेरेब्रल पाल्सी दिन आहे.
 
सेरेब्रल पाल्सी हा आजार नेमका काय आहे आणि या आजारामुळे शरीरावर नेमके काय परिणाम होतात, हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
 
गेल्यावर्षी म्हणजे 1 मार्च 2022 मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांचा 26 वर्षांचा मुलगा झेन नाडेला याचं निधन झालं. झेनला असणाऱ्या सेरेब्रल पाल्सी आजार झाला होता. त्यावेळीही या आजाराविषयी सध्या चर्चा सुरू होती.
 
सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय?
Cerebral Palsy या नावातल्या सेरेब्रलचा अर्थ मेंदूशी निगडीत आणि Palsy म्हणजे स्नायूंमधील कमकुवतपणा किंवा स्नायूंच्या हालचालींमध्ये येणाऱ्या अडचणी.
 
सेरेब्रल पाल्सी असणाऱ्या व्यक्तीला स्नायूंवर योग्य नियंत्रण ठेवणं कठीण जातं आणि त्यामुळे शारीरिक हालचालींवर त्याचे परिणाम होतात.
 
सेरेब्रल पाल्सी कशामुळे होतो?
जन्माआधी, जन्माच्या वेळी किंवा जन्मानंतर लगेचच नाजूक, अपरिपक्व, विकसनशील मेंदूला इजा वा नुकसान पोहोचल्याने ही सेरेब्रल पाल्सी डिसॉर्डर होते. पण यामागचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट नाही.
 
बहुतांश वेळा बाळ गर्भाशयात असतानाच निर्माण झालेल्या अडचणींचा परिणाम गर्भाशयातल्या बाळाच्या मेंदूच्या विकासावर होतो. गर्भाशयातल्या बाळाला होणारा रक्तपुरवठा किंवा ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यास बाळाच्या मेंदूला इजा होऊ शकते.
 
गर्भवती महिलेला रुबेला, कांजिण्या, टॉक्सोप्लाझ्मोसिस किंवा सायटोमेगालोव्हायरसचं इन्फेक्शन झाल्यास त्याचा परिणाम बाळावर होऊ शकतो.
 
स्ट्रोकमुळे बाळाच्या मेंदूत रक्तस्राव झाल्यास वा मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो.
 
जन्मापूर्वीच गर्भाशयातल्या बाळाच्या मेंदूला झालेली इजाही सेरेब्रल पाल्सीसाठी कारणीभूत ठरू शकते.
 
प्रसूतीच्या वेळी वा बाळाच्या जन्मानंतर आलेल्या अडचणी
बाळाचा जन्म होत असताना किंवा जन्मानंतर लगेचच आलेल्या काही अडचणीही सेरेब्रल पाल्सीसाठी कारणीभूत ठरू शकतात.
 
बाळाच्या मेंदूला काही काळ ऑक्सिजन पुरवठा न झाल्यास (asphyxiation)
मेनिन्जायटिस (Meningitis) सारखं मेंदूला होणार इन्फेक्शन
डोक्याला झालेली गंभीर इजा
गुदमरणं किंवा पाण्यात जवळपास बुडणं (Choking or nearly drowning) ज्यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.
रक्तातल्या साखरेची पातळी अतिशय कमी होणं.
स्ट्रोक
 
या गोष्टींमुळे वाढतो सेरेब्रल पाल्सीचा धोका
प्रीमॅच्युअर किंवा अपुऱ्या वेळेत झालेली प्रसुती. 32 व्या आठवड्यात किंवा त्या आधी जन्मलेल्या बाळांना सेरेब्रल पाल्सीचा धोका जास्त असतो.
 
जन्माच्या वेळेस बाळाचं वजन अतिशय कमी असेल किंवा एकाच वेळी जन्म होत असलेल्या बाळांना, जुळी, तिळ्या बाळांमध्येही सेरेब्रल पाल्सीचा धोका असतो.
 
गर्भवती महिलेनं सिगेरट ओढल्यास, दारू वा कोकेनसारख्या ड्रग्जचं गर्भारपणात सेवन केल्यास बाळाला सेरेब्रल पाल्सीचा धोका निर्माण होतो.
 
अगदी तान्ह्या बाळांमध्ये किंवा सुरुवातीच्या वर्षांमध्येच सेरेब्रल पाल्सीची लक्षणं दिसून येतात.
 
सेरेब्रल पाल्सीची प्रत्येक व्यक्तीमधली कारणं आणि त्याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात.
 
सेरेब्रल पाल्सीची लक्षणं
व्यक्तीनिहाय सेरेब्रल पाल्सीची लक्षणं वेगवेगळी असतात. काहीजणांमध्ये या डिसॉर्डरचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. तर काहींच्या शरीराच्या एका बाजूवर वा हात वा पायांसारख्या अवयवांवर सेरेब्रल पाल्सीचे परिणाम दिसून येतात.
 
ताणले गेलेले (Stiff) वा ताठरलेले स्नायू Spasticity आणि त्याचा हालचालीवर झालेला परिणाम हे सेरेब्रल पाल्सीचं लक्षण अनेकांमध्ये दिसून येतं.
 
कधीकधी स्नायूंच्या लवचिकतेतही वेगळेपणा दिसून येतो. काहींमध्ये स्नायू ताठरलेले असतात, तर काहींमध्ये स्नायू अगदीच कमकुवत असतात. अशा व्यक्तींना आधाराशिवाय तोल सावरून धरणं आणि muscle coordination साधणं, आधाराशिवाय चालणं कठीण जातं.
 
Fine Motor skills म्हणजे स्नायूंचा वापर करून रोजच्या आयुष्यातल्या लहान लहान गोष्टी करायला (शर्टाची बटणं लावणं, एखादी वस्तू वा भांडं उचलणं) या व्यक्तींना कठीण जातं.
 
काही मुलांना या डिसॉर्डरमुळे बोलायला त्रास होतं. या मुलांमध्ये Speech Development उशीरा होते. काहींना बोलायला, अन्न चघळायला, चावायला, गिळायलाही त्रास होतो.
 
सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांचा शारीरिक विकास इतर मुलांच्या तुलनेत उशीरा होतो. या बाळांना रांगणं, बसणं असे टप्पे गाठायला वेळ लागतो.
 
काहींमध्ये या सेरेब्रल पाल्सीचा परिणाम मानसिक विकलांग किंवा Learning Disablilities च्या स्वरूपातही दिसून येतो.
 
एपिलेप्सी (आकडी येणं), ऐकू न येणं, दष्टीदोष, पचनक्रियेतले दोषही सेरेब्रल पाल्सीमुळे निर्माण होऊ शकतात.
 
सेरेब्रल पाल्सीचं निदान
बाळामधली लक्षणं तपासून आणि विविध चाचण्यांद्वारे सेरेब्रल पाल्सीचं निदान केलं जातं.
 
बाळाची लक्षणं तपासल्यानंतर Cranial Ultrasound scan, MRI Scan, CT स्कॅनसारख्या चाचण्या केल्या जातात. त्यासोबतच Electroencephalogram (EEG) सारख्या चाचण्या एपिलेप्सीसाठी केल्या जातात.
 
बाळाच्या जन्माआधी सेरेब्रल पाल्सीचं निदान कोणत्याही चाचणीने होऊ शकत नाही. त्यामुळे प्रेग्नन्सीदरम्यान ही डिसॉर्डर डिटेक्ट केली जाऊ शकत नाही.
 
उपचार
दुदैवाने सेरेब्रल पाल्सीतून पूर्णपणे बरे करणारे उपचार नाहीत. पण सेरेब्रल पाल्सी डिसॉर्डर असणाऱ्यांचं आयुष्य सुकर व्हावं, त्यांना अॅक्टिव्ह रहाता यावं, स्वावलंबी होता यावं म्हणून लक्षणांवर औषधं दिली जातात.
 
स्पीच थेरपी, स्वालो थेरपी (Swallow Thearapy), फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपीची मदत यासाठी घेतली जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती