लहान मुलांना पोटात जंत होणे ही सामान्य बाब आहे. अनेकदा काही जीवाणू आणि जंतू अन्नासोबत पोटात पोहोचतात. अशा प्रकारचे दूषित अन्न हे मुलांच्या पोटात जंत तयार होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. पोटात जंत वाढल्यानंतर मुलांना पोटदुखी, उलट्या आणि अशक्तपणा जाणवू शकतो, परंतु योग्य वेळी उपचार न केल्यास मुलांना इतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
मुलामध्ये पोटातील जंतांवर उपचार करणे महत्वाचे का आहे?
वेळेवर उपचार मिळाल्याने पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. तसेच आतड्यांमध्ये तयार होणारे कृमी पचनसंस्थेला हानी पोहोचवतात, ज्यामुळे आतड्यांना अन्नातून पोषक तत्त्वे मिळणे कठीण होते. त्यामुळे मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे बालकांचा शारीरिक व मानसिक विकास खुंटतो. म्हणूनच दर 6 महिन्यांनी मुलाच्या पोटाची तपासणी करून त्याला जंतनाशक औषध द्यावी. मुले 12-14 वर्षांची होईपर्यंत त्यांना नियमितपणे औषध द्यावं.
वेळेवर उपचार केल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत नाही. परजीवीमुळे होणारे संक्रमण रोगप्रतिकारक शक्तीवर देखील परिणाम करते, ज्यामुळे मुलांचे आजारी पडण्याचा धोका वाढतो. परंतु जंतनाशक प्रक्रियेमुळे या आजारांपासून मुलांचे संरक्षण करणे सोपे होते. मुलाच्या पोटातील जंतांवर उपचार 15 महिन्यांपासून सुरू केले जाऊ शकतात आणि 14 वर्षांपर्यंत चालू ठेवता येतात.