तर तुमचा टॉवेल बनू शकतो तुमच्या त्वचेचा शत्रू

शनिवार, 4 जानेवारी 2020 (17:11 IST)
आंघोळ केल्यानंतर मिळणारा फ्रेशनेस कशातच नाही. दिवसातून किमान एकदातरी आपण आंघोळ करतो. आंघोळ केल्यानंतर अंग पुसण्यासाठी आपण टॉवेलचा उपयोग करतो. तुम्ही वापरत असलेला टॉवेल तुमचे शरीर पुसण्याचे काम करतो पण या शिवाय तुमच्या शरीरावरील मळ काढण्यासही मदत करतो. पण जर तुम्ही तुमच्या टॉवेलची योग्य काळजी घेतली नाही तर मात्र हाच टॉवेल तुमच्या त्वचेच्या शत्रू बनू शकतो.
 
आज आम्ही तुम्हाला या बद्दलच अधिक माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्ही ही टॉवेल कसाही वापरत असाल तर हे नक्की वाचा.
 
टॉवेलची स्वच्छता
काही जणांना टॉवेल सतत धुण्याची गरज नसते असे वाटते. तुम्ही असा विचार करत असाल तर तो अगदीच चुकीचा आहे. कारण तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुमच्या शरीरावर साचलेली मळ काढण्याचे काम करते. त्यामुळे साहजिकच तुमचा मळ त्यावर साचून राहतो. अशावेळी जर तुम्ही हा टॉवेल सतत वापरत राहिला तर तुमच्या त्वचेवरही मळ साचत राहील. त्यामुळे तुम्हाला स्वच्छ करणार्‍या टॉवेलची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी तुमचा टॉवेल धुणे अपेक्षित असते. जर तुमचा
टॉवेल पातळ असेल तर तुम्ही तो रोज धुतला तर फारच उत्तम.
 
आता आली फेकून देण्याची वेळ
टॉवेल कितीही चांगला वाटत असला तरी त्याला वापरण्याचीही काहीतरी मर्यादा आहे. तुम्ही वर्षानुवर्ष एकच टॉवेल वापरु शकत नाही. तुम्हाला कालांतराने टॉवेल फेकण्याचीही गरज असते. तुम्ही कॉटन किंवा टर्किश कोणताही टॉवेल वापरत असाल तरीदेखील तुम्ही हा टॉवेल सहा महिन्यांनी काढून टाकायला हवा. जास्तीत जास्त 6 महिने आणि कमीत कमी 3 महिने तुम्ही टॉवेल वापरायला हवा.
 
टर्किश की कॉटन टॉवेल
तुमची त्वचा ही फारच नाजूक असते. कोणतेही कॉस्मेटिक्स वापरताना तुम्ही अगदी पारखून सगळ्या गोष्टी तपासता. पण मग टॉवेलच्या बाबतीत का नाही? तुम्हाला लवकर वाळणारा टॉवेल हवा असेल तर तुम्ही पंचा किंवा पातळ टॉवेलची निवड करा. जर तुम्हाला मऊ असा टॉवेल हवा असेल तर तुम्ही टर्किश टॉवेलचा वापर करा. आता तुमच्या आवडीवर टॉवेलची निवड अवलंबून आहे.
 
सूर्यप्रकाश महत्त्वाचा
अनेकांना टॉवेल वाळत घालण्याचा कंटाळा असतो. पण तुमच्या टॉवेलसाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही तुमचा टॉवेल सूर्यप्रकाशात वाळत घालायला हवा. कारण जर त्या टॉवेलवर काही जंतू असतील आणि तुम्हाला टॉवेल धुणे शक्य नसेल अशावेळी कडकडीत उन्हात टॉवेल ठेवल्यामुळे त्यावरील जीवाणू कमी होतात.
 
एकट्याने वापरण्याची गरज
शेअरींग केअरींग मध्ये तुम्ही एकाच टॉवेलचा दोन ते तीन जण वापर करत असाल तर ते तुमच्या त्वचेसाठी फारच वाईट आहे. कारण दोन ते तीन जणांनी एकच टॉवेल वापरला तर तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही कधीही एकच टॉवेल दोन ते तीन जणांमध्ये वापरु नका. तुम्हाला त्वचा विकार जडण्याची शक्यता यामध्ये अधिक असते. आता तुम्हाला टॉवेल हा आंघोळीपुरता वाटत असला तरी त्याचे महत्व काय ते नक्कीच कळलं असेल त्यामुळे यापुढे याची अधिक खबरदारी घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती