जीवनसत्त्वांची खाण असते ती भाज्यांमध्ये. म्हणूनच आपल्याकडे पूर्वापार कानीकपाळी ओरडून भाज्या खायला सांगितल्या जातात. बहुतेकांच्या आहारात भाज्यांचा समावेश असतो. मात्र, भाज्या शिजवताना आपण काही गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्यामुळे भाज्यांमधील आरोग्यदायी वैशिष्ट्ये लोप पावतात. असे होऊ नये म्हणून...
आपण ताज्या भाज्या आणतो तेव्हा त्यात असणारे पोषक घटक फार वेळ कायम राहात नाहीत. काही दिवसांनंतर ताज्या, तजेलदार, करकरीत असणार्या भाज्या पिवळ्या पडतात, सुकून जातात. भाज्या शिजवताना देखील काही चुका करतो त्यामुळे तर या भाज्यांमधील पोषकता आणखीन घटते.
खूप लवकर शिजवून ठेवणे : आपण भाज्या स्वच्छ धुवून कापल्या की त्यातील घटकांचा हवेशी संपर्क होतो. शिवाय खराब झाल्याने मरगळल्याने या भाज्यांतील पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे भाज्या वापरायच्या असतील तेव्हाच त्या चिरून घ्या. हीच गोष्ट पालेभाज्यांची. पालेभाज्या धुतल्या की त्या लगेचच शिजवल्या पाहिजेत. नाहीतर त्या सुकून जाऊ लागतात.
भाज्या अतिशिजवणे-काही भाज्या अतिशिजवल्यास त्यांचा रंग बदलतो. काही भाज्यांचा रंग काळपट होतो. उदा. ब्रोकोली. सुंदर हिरवीगार, चकचकीत हिरव्या रंगाची ब्रोकोली आपण भांड्यात शिजायला घालतो त्यावेळी ब्रोकोलीचा हिरवागार रंग फिका व्हायला लागतो. अति शिजवल्याने तो काळपट होतो.