मासिक पाळीमध्ये वेदना का होतात? या वेदना कधी गंभीर ठरू शकतात?

सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (09:34 IST)
बहुतांश स्त्रियांना मासिक पाळीत वेदना होतात. सहसा ही वेदना ओटीपोटात येणाऱ्या पेटक्यांच्या म्हणजेच क्रॅम्पच्या स्वरुपात असते आणि ती पाठ, मांड्या, पाय आणि शरीराच्या इतर भागातही पसरू शकते. मासिक पाळी सुरू असताना या वेदना कधी मध्यमस्वरुपाच्या आणि सतत सुरू असतात. कधी त्या तीव्र आणि अधिक वेदनादायी असतात. मासिक पाळीदरम्यान काहींना मळमळ, अतिसार आणि डोकेदुखीचाही त्रास होतो.
 
खरं सांगायचं तर मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना या अनेक प्रकारच्या असतात. वेदना कुठे होतात, त्यांची तीव्रता किती, हे प्रत्येकीमध्ये वेगवेगळं असू शकतं.
 
मासिक पाळीत त्रास का होतो?
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील स्त्री आरोग्याशी संबंधित विभागातील संशोधक डॉ. केटी व्हिन्सेंट यांना आम्ही याविषयी विचारलं.
 
त्यांनी सांगितलं, "जवळपास 30 ते 50% स्रियांना मासिक पाळीदरम्यान त्रास होतो आणि काहींना होणार त्रास इतका जास्त असतो की त्याचा त्यांच्या आयुष्यावरच परिणाम होत असतो."
 
याबद्दल सविस्तर सांगताना त्या म्हणाल्या, "पाळी येते तेव्हा रक्त बाहेर पडण्यासाठी गर्भाशय आकुंचन पावतं. क्लॉट बाहेर पडताना जी एक हलकीशी भावना जाणवते ती कदाचित क्लॉट बाहेर काढण्यासाठी सर्व्हिक्स (गर्भाशयमुख) थोडं उघडतं तेव्हा जाणवते. गर्भाशय आकुंचन आणि गर्भाशयमुख उघडणं, या दोन्ही क्रिया एकाचवेळी होत असतात."
 
पाळीदरम्यान शरीरात बराच दाह म्हणजेच इन्फ्लामेशनसुद्धा (inflammation) होत असतो.
 
गर्भाशयातील पेशी एक विशिष्ट प्रकारचं केमिकल सोडतात, ज्यामुळे वेदना होतात. शरीर प्रोस्टॅग्लँडिन तयार करतं असतं. मासिक पाळीदरम्यान ते जास्त प्रमाणात तयार होतं.
 
प्रोस्टॅग्लँडिन हे पेशींमध्ये तयार होणारं फॅटी कम्पाउंड आहे आणि शरीरात वेगवेगळ्या प्रकारची कार्य करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो.
 
उदाहरणार्थ- मासिक पाळीदरम्यान गर्भाशयातील स्नायू आकुंचित करण्यात त्याची मदत होते. शिवाय, पाळीदरम्यान होणाऱ्या इन्फ्लामेशनमध्ये त्याची भूमिका असते आणि त्यामुळे वेदना होतात.
 
प्रोस्टॅग्लँडिन हे संप्रेरक (हॉर्मोन) नाही. मात्र, त्यांचं काम हे बऱ्यापैकी संप्रेरकांसारखंच असतं.
 
डॉ. व्हिन्सेट म्हणतात, "प्रोस्टॅग्लँडिन मासिक पाळीत वाढणारं इन्फ्लामेशन आणि वेदना याला कारणीभूत असणाऱ्या घटकांपैकी एक आहे, असं आम्हाला निश्चितपणे वाटतं."
 
पण, हे इन्फ्लामेशन आणि त्यामुळे होणाऱ्या वेदना यांचं काम काय आहे?
 
डॉ. व्हिन्सेन्ट म्हणतात, "इन्फ्लामेशनची अनेक कार्यं सकारात्मक असतात. जेव्हा तुम्हाला एखादी जखम होते तिथे इन्फ्लामेशन होतं. यावेळी अशी प्रक्रिया घडते जी पेशी बऱ्या होण्यास मदत करते. शिवाय, ते आपल्याला जखम झाली आहे आणि ती बरी होईपर्यंत तिची काळजी घ्यायची आहे, याची सतत जाणीव करून देत असते."
तेव्हा इन्फ्लामेशन ही शरीराला जी काही इजा, त्रास, दुखापत झाली आहे ती बरी करण्यासाठीची एक आवश्यक प्रक्रिया आहे.
 
त्यामुळे मासिक पाळीदरम्यान येणारे क्रॅम्प्स आणि वेदना गर्भाशयाचं अस्तर योग्यरित्या बरं होण्यासाठी आणि संपूर्ण मेन्स्ट्रुएल फ्लुइड गर्भाशयातून बाहेर काढण्यासाठी मदत करणाऱ्या प्रोस्टॅग्लँडिनचा परिणाम आहे.
 
मात्र, जेव्हा ही प्रक्रिया जास्त प्रमाणात घडते तेव्हा समस्या उद्भवते.
 
मासिक पाळीतील वेदना कधी गंभीर ठरू शकतात?
ज्या स्त्रियांना मासिक पाळीत त्रास होतो त्यांच्यापैकी अनेकींना वेदनाशामक किंवा अॅन्टी-इन्फ्लामेटरी औषध घेऊन आराम मिळू शकतो.
 
मात्र, काही स्त्रियांमध्ये मासिक पाळीत होणाऱ्या वेदनेमागे इतर आजार असू शकतात. असाच एक आजार म्हणजे गर्भाशयातील फायब्रॉईड्स. फायब्राईड्स म्हणजे अशा गाठी ज्या कॅन्सरच्या नसतात आणि त्या गर्भाशयाच्या आत किंवा सभोवती येतात. अशा गाठींमुळेदेखील मासिक पाळीत मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव आणि तीव्र वेदना होतात.
 
पेल्व्हिक इन्फ्लामेटरी डिसीज (PID) या कंडिशनमुळेही मासिक पाळीत वेदना होतात. गर्भाशय, फेलोपिअन ट्युब किंवा अंडाशयातील जीवाणू संसर्गाला PID म्हणतात.
 
क्लॅमिडिया आणि गोनोरिया यासारखे सेक्च्युली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचे जीवाणू पीआयडीसाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे ज्यांना हा संसर्ग आहे अशा व्यक्तीशी ठेवलेल्या असुरक्षित शरीर संबंधामुळे पीआयडी होऊ शकतो.
 
गर्भनिरोधासाठी म्हणजे गर्भधारणा होऊ नये, यासाठी गर्भाशयात घातल्या जाणाऱ्या उपकरणामुळेही मासिक पाळीदरम्यान त्रास होऊ शकतो. असं असलं तरी मासिक पाळीदरम्यान ओटीपोटात होणाऱ्या वेदनांमागे एंडोमेट्रिओसीस हे कदाचित सर्वात महत्त्वाचं कारण आहे.
 
वेदनादायी मासिक पाळीमागची महत्त्वाची कारणे
एन्डोमेट्रिओसिस
मायोमस
तांब्यापासून बनलेले इन्ट्रायुटेरियन डिव्हाईस (IUD) म्हणजेच गर्भाशयात घातले जाणारे उपकरण
पेल्व्हिक इन्फ्लामेटरी डिसीज (PID)
मासिक पाळीपूर्व सिंड्रोम (PMS)
शरीरसंबंधादरम्यान संक्रमित होणारा संसर्ग
 
एन्डोमेट्रिओसिस म्हणजे काय?
स्कॉटलँडमधील एडिनबर्ग विद्यापीठात स्त्रीरोग आणि प्रजनन विषयाचे प्राध्यापक अँड्रू हॉर्ने एन्डोमेट्रिओसिसच्या कारणांवर संशोधन करत आहेत.
 
ते सांगतात, "गर्भाशयातील अस्तर म्हणजेच एन्डोमेट्रियममध्ये असणाऱ्या पेशी जेव्हा गर्भाशयाबाहेर ओटीपोटाचा भाग, अंडाशय, मूत्राशय किंवा आतडे अशा ठिकाणी वाढतात त्याला आम्ही एन्डोमेट्रिओसिस म्हणतो."
 
6 ते 10% स्त्रियांना हा आजार असतो. या आजारामुळे मासिक पाळीत ओटीपोटात तीव्र वेदना तर होतातच. शिवाय या आजारामुळे गर्भधारणा होण्यात आणि गर्भधारणा झाल्यास ती पूर्ण 9 महिने टिकण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो.
एन्डोमेट्रिओसिस कशामुळे होतो, याचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही. मात्र, हा आजार असणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
 
प्रा. अँड्र्यू हॉर्न म्हणतात, "एन्डोमेट्रिओसीसमुळे होणाऱ्या परिणामांना कमी लेखता कामा नये. ज्यांना हा आहे त्यांच्यासाठी हा भयंकर ठरू शकतो."
 
ते पुढे सांगतात, "मात्र, या आजारामुळे वेदना का होतात, याबद्दल अजून फारशी माहिती नाही."
 
या आजारात अडचण अशी असते की त्याचं निदान लवकर आणि सहज करता येत नाही.
 
प्रा. अॅन्ड्रू हॉर्न सांगतात, "एन्डोमेट्रिओसिसच्या लक्षणांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही कारण (मासिक पाळीत) ती सामान्य मानली जातात."
 
ते पुढे सांगतात, "दुसरी मोठी अडचण अशी की एन्डोमेट्रिओसिसची लक्षणं आतड्यांची जळजळ, मूत्राशयातील वेदना यासारख्या इतर आजारांसारखीच असतात. त्यामुळे या आजाराचं निदान लवकर होत नाही."
 
एन्डोमेट्रिओसिसची लक्षणं
प्रा. हॉर्न यांच्य मते या आजाराचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे मासिक पाळीशिवाय लघवी किंवा शौच करताना किंवा शरीरसंबंधावेळी ओटीपोटात दुखणे.
 
शिवाय, स्कॅन किंवा रक्त चाचणी करून एन्डोमेट्रिओसिसचं निदान करता येत नाही. या आजाराचं निदान करण्याचा केवळ एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे लेप्रोस्कोपी.
 
ही एक छोटी सर्जरी असते. यात पोटावर एक छोटं छिद्र करून त्यातून लॅप्रोस्कोप म्हणजे एक प्रकारची दुर्बीण आत टाकतात आणि त्याद्वारे ओटीपोटात एन्डोमेट्रिओसिस आहे का, हे तपासतात.
 
एन्डोमेट्रिओसिसवर कुठलाच उपचार नाही. केवळ लक्षणांपासून आराम देण्यासाठी औषोधोपचार दिले जाऊ शकतात.
 
शस्त्रक्रिया करून एन्डोमेट्रियल वाढ काढता येते किंवा हिस्टेरोटोमी (ही देखील एक प्रकारची शस्त्रक्रियाच आहे) करून संपूर्ण गर्भाशय काढून टाकता येतं. याशिवाय, हॉर्मोनल उपचारही आहेत.
 
मात्र, हा आजार पूर्णपणे रोखता येईल आणि स्त्रियांना वेदनेपासून सुटका मिळेल, असं औषध किंवा उपचार शोधून काढणं, हे या आजारावर सुरू असणाऱ्या संशोधनाचा उद्देश आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती