तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल मात्र गेल्या दहा वर्षांपासून विकसित देशात साखर खाणं कमी केलं आहे. याची अनेक कारणं आहे.
उदा. चवीत आणि दिनचर्येत बदल. गेल्या दहा वर्षात कार्बोहायड्रेट्स कमी असलेल्या आहाराकडे लोकांचा कल वाढला आहे. किटो इत्यादी डाएट प्रकाराला लोकांनी पसंती दिली आहे. तसंच अति प्रमाणात साखर खाण्याचा धोकाही लोकांना कळला आहे.
साखर कमी करण्याचे किंवा कमी गोड खाण्याचे फायदे आहेतच. कमी साखर खाल्याने शरीरात कमी कॅलरीज जातात, त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते, दातांचं आरोग्य सुधारतं. मात्र कमी गोड खाल्ल्याने मूड स्विंग, डोकेदुखी, हे तोटे आहेत. हे तोटे थोड्या काळासाठी असतात. याची कारणं अद्यापही ठाऊक नाही. गोड पदार्थ समोर आल्यावरची ही प्रतिक्रिया असावी असा अंदाज आहे.
कार्बोहायड्रेट्स साखरेसह वेगवेगळ्या पदार्थात असतात. तसंच अनेक फळांमध्ये आणि दुधातही असतात. आपण रोजच्या जेवणात जी साखर खातो ती उसात, बीट आणि मॅपल सिरपमध्ये असते. तर मधात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे घटक असतात.
हल्ली कोणत्याही पदार्थाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. अनेक पदार्थ आकर्षक दिसण्यासाठी त्यात वेगवेगळ्या प्रकारची साखर घालतात. त्यामुळे पदार्थाची चव तर छान लागतेच पण त्याचबरोबर साखरेचे मेंदूवरही तितकेच परिणाम होतात. हा परिणाम इतका मोठा असतो की साखरेचं व्यसन लागू शकतं. अर्थात हा दावा अजूनही तपासून पाहिला जात आहे.
सुक्रोज या साखरेतील घटकामुळे जीभेवरील गोड चवीचे रिसेप्टर कार्यान्वित होतात. त्यामुळे मेंदूत डोपामाईन नावाचं रसायन मेंदूत तयार होतं. या रसायनामुळे मेंदूत आनंद लहरी तयार होतात. म्हणून काहीतरी छान खायची इच्छा होते. विशेषत: चमचमीत खाणं. डोपामाईनला Reward chemical असंही म्हणतात. Reward म्हणजे बक्षीस. याचाच अर्थ असा की डोपामाईन मेंदूत तयार झालं की स्वत:ला काहीतरी बक्षीस देण्याची इच्छा होते आणि बऱ्याचदा हे बक्षीस साखरेच्या रुपात मिळावं असं वाटतं.
हे सगळं कसं होतं याबद्दल माणसं आणि प्राणी यांच्यावर संशोधन करण्यात आलं आहे.
अति गोड पदार्थांमध्ये तर स्वत:ला बक्षिस देण्याची क्षमता कोकेनपेक्षा जास्त असते. गोड पदार्थांची चव जिभेवर तरळली किंवा इंजेक्शनवाटे दिली तरी बक्षीस देण्याची उर्मी जागी होते असं उंदरांवर केलेल्या अभ्यासात समोर आलं आहे. त्यामुळे गोडवा कितीही असला तरी परिणाम एकच असतो हे सिद्ध झालं आहे. सुक्रोझ घेतल्याने डोपामाईन मुळे मेंदूच्या रचनेवर परिणाम होतात. तसंच प्राणी आणि मनुष्यप्राण्यांमध्ये भावनिक बदल होतात.
साखरेचा आपल्यावर परिणाम होतो हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे साखर न खाल्ल्यामुळे शरीरावर त्याचे परिणाम होतातच. साखर सोडल्यावर मानसिक आणि शारीरिक लक्षणं लगेच दिसायला सुरुवात होते. त्यात डिप्रेशन, काळजी, वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा, मेंदूत थकवा, डोकेदुखी, झोप येणे या लक्षणांचा समावेश आहे. याचाच अर्थ साखर सोडली की प्रसन्न वाटत नाही. म्हणून या बदलाशी जुळवून घेणं अनेकांना अवघड जातं.
या लक्षणांचा अद्याप सखोल अभ्यास झालेला नाही. मात्र त्यांचा संबंध बक्षिस देण्याच्या व्यवस्थेशी असावा असा कयास आहे. साखरेचं व्यसन हा वादग्रस्त मुद्दा असला तरी साखरेमुळे स्वत:वर ताबा न राहता सतत खायची इच्छा होते. तसंच एखादं व्यसन सोडल्यानंतर जी लक्षणं दिसतात ती दिसायला सुरुवात होते. नंतर पुन्हा साखरेचं व्यसनही लागू शकतं. हा सगळा परिणाम अंमली पदार्थांसारखाच आहे. मात्र हे सगळं प्राण्यांमध्ये दिसलं आहे. त्यामुळे माणसांवर हेच परिणाम होतात का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
बक्षीस देण्याची उर्मी ही प्रक्रिया माणसाच्या उत्क्रांतीनंतरही कायम राहिली आहे. इतर प्राण्यांच्या मेंदूतही अशीच प्रक्रिया होत असते. त्यामुळे साखर सोडल्यावर जे परिणाम प्राण्यांमध्ये दिसतात तेच परिणाम मनुष्यप्राण्यांमध्ये पहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
अन्नातून साखर काढली तर डोपामाईनच्या परिणामांमध्ये वेगाने घट होते. त्यामुळे मेंदूच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मेंदूच्या बदललेल्या रासायनिक रचनेमुळे साखर सोडल्यावर किंवा कमी केल्यावर त्याची लक्षणं दिसू लागतात. बक्षीस प्रक्रियेत डोपामाईनचा सहभाग असतोच पण त्याचबरोबर हार्मोन्सवर नियंत्रण ठेवण्यातही डोपामाईनचा सहभाग असतो. म्हणून ओकाऱ्या, चिंता, नॉशिया अशा प्रकारची लक्षणं आढळतात. रोजच्या जेवण्यातून साखर वगळल्यावर मेंदूच्या कार्यरचनेत फरक पडतो त्यामुळे अनेक लोकांना ही लक्षणं ठळकपणे जाणवतात.
साखर सोडल्यावरची लक्षणं मनुष्यप्राण्यांत कमी प्रमाणात आढळतात. तरीही पौगंडावस्थेतील लठ्ठ मुलांमध्ये साखर सोडल्यावर ती अधिकाधिक खाण्याची उर्मी आढळल्याचं एका संशोधनात सिद्ध झालं आहे.
आहारात कोणताही बदल केल्यावर तो काटेकोरपणे पाळणं महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला साखर सोडायची असेल तर पहिले काही आठवडे फारच कठीण असतात.मात्र साखर तितकीही वाईट नाही हेही तितकंच खरं आहे. मात्र संतुलित आहार आणि योग्य व्यायामाची जोड दिली तर साखर सोडायची पाळी येणार नाही. शेवटी 'थोडक्यात गोडी' असते असं म्हणतात ते उगाच नाही.