बहुतेकांना कमी-अधिक प्रमाणात थंडीचा त्रास होत असतो. बदलती जीवनशैली, धावपळीत पुरेशी व आवश्यक विश्रांती घेता न येणे, बदलते हवामान यामुळे हृदयविकाराचा त्रास बळावू शकतो. किंबहुना, तरुणांमध्येही थंडीच्या दिवसांमध्ये हृदयविकार बळावण्याचे प्रकार वाढले आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये मधुमेहाला बळ मिळते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
थंडीचे दिवस आरोग्यासाठी लाभदायी असतात. या दिवसांमध्ये भूक चांगली लागते आणि भरपूर जेवण घेतल्यावर तृप्तीचे समाधान मिळते. झोपही व्यवस्थित घेता येते. थंडीत पचनक्रिया गतिमान आणि चांगली राहत असल्याने खाण्या-पिण्याच्या बाबतीत थोडीशी बेपर्वाई वाढते. स्वादिष्ट आणि गोड-धोड खाण्याची इच्छा भरपूर खाण्यास बळ देते. त्यामुळे मधुमेहाला, पर्यायाने हृदयविकाराला निमंत्रण मिळते. थंडीचा प्रभाव वाढताच हृदयात रक्ताभिसरण करणार्या धमनीत कोलेस्टोरॉल जमा होऊ लागते. त्यामुळे धमनीची कार्यक्षमता कमी होऊ लागते. परिणामी, रक्ताच्या पेशींमधून पुरेशाप्रमाणात रक्तपुरवठा होण्यात अडथळे तयार होतात. त्यामुळे शरीराची कार्यक्षमता प्रभावित होते. मधुमेह वा हृदयविकाराचा त्रास असलेल्यांना याची जाणीव होऊ लागते. हा त्रास टाळण्यासाठी करावयाचे उपाय साधे-सोपे आहेत.
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी पायी फिरणे टाळू नका. मधुमेहाची नियमित तपासणी करा. वजन वाढले असल्यास नियंत्रित करा. भरपूर पाणी प्या. तणावमुक्त राहून किमान आठ तास झोप घ्या. संतुलित आहार घ्या. कोलेस्टोरॉल नियंत्रित करण्यासाठी तळलेले पदार्थ व फास्टफूड घेणे कटाक्षाने टाळा. हिरव्या पालेभाज्या खा. काजू अथवा शेंगदाणे खाणे टाळा. कारण यामुळे कोलेस्टोरॉलचे प्रमाण वाढू शकते.
या काळात व्यायाम कामी येतोच, पण पुढील काही काळ शरीर सुदृढ ठेवण्यासाठीही उपकारक ठरतो. म्हणूनच हिवाळा चांगला जाणवत असताना तब्बेतीची खास काळजी घेणे आवश्यक ठरते. पण अशाकाळजीचा शरीराला फायदाच होत असतो, हेही लक्षात घ्यायला हवे. अन्यथा, काही जुने त्रास डोके वर काढू शकतात.