मासिक पाळी पुढे ढकलताय ?

शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (16:09 IST)
सण, समारंभ, पर्यटन किंवा धार्मिक कार्याच्या आड येणारी मासिक पाळी पुढे ढकलण्याचा निर्णय अनेक महिला घेतात. मात्र अशा प्रकारे निसर्गचक्रात हस्तक्षेप करणं चुकीचं आहे. बरंच प्रबोधन होऊनही मासिक पाळीबबातचे गैरसमज कमी झालेले नाहीत. म्हणूनच महिलांना कृत्रिम पद्धतीने पाळी पुढे ढकलावी लागते. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतल्या जातात. पण या गोळ्यांचे शरीरावर दीर्घकालीन परिणाम होतात. 
 
* मासिक पाळी पुढे ढकलणार्‍या गोळ्यांच्या सततच्या सेवनामुळे या संदर्भातल्या नैसर्गिक चक्रावर परिणाम होऊ शकतो. शिवाय महिलांच्या प्रजननक्षमतेवरही याचे घातक परिणाम दिसून येतात.
 
* या गोळ्यांचं सेवन केल्यानंतर पुढचा काही काळ मासिक पाळीदरम्यान मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. जवळपास 20 टक्के महिलांना हा अनुभव येतो. पुढचे काही महिने मासिक पाळीतून अधिक प्रमाणात रक्त जाऊ शकतं.
 
* या गोळ्या बर्‍याच काळपर्यंत घेत राहिल्यास आरोग्यावर अत्यंत घातक असे परिणाम दिसून येतात. नसांमध्ये रक्ताची गुठळी होण्यासारख्या समस्या जाणवू शकतात. या गोळ्यांमुळे इतर औषधांच्या शरीरावरच्या प्रभावावर विपरित परिणाम होऊ शकतो.
 
* या गोळ्या घेतल्यानंतर इतर काही दुष्परिणाम होऊ शकतात. जुलाब, हातापायांमध्ये गोळे येणं, अवेळी रक्तस्राव होणं हे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. 

मधुरा कुलकर्णी 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती