JN1: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणं काय, तो किती धोकादायक?

बुधवार, 20 डिसेंबर 2023 (19:26 IST)
केरळ राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला असून जेएन1 असं या व्हेरिएंटचं नाव आहे. या घटनेनंतर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.महाराष्ट्रातही आज (20 डिसेंबर) कोव्हिडचे 14 नवीन रुग्ण सापडले आहेत.
 
केंद्र सरकारनेही प्रत्येक राज्याला या व्हेरिएंट पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय संपूर्ण प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.
 
केरळमध्ये शनिवारी (16 डिसेंबर) कोव्हिडमुळे चार जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या चाचण्यांमुळे कोव्हिडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे, कोरोनाविरोधातल्या सर्व मान्यताप्राप्त लशी या नव्या व्हेरिएंटपासूनही संरक्षण करू शकतील.
 
सक्रिय प्रकरणांपैकी किती प्रकरणं नव्या जेएन1 या व्हेरिएंटशी संबंधित आहेत याची माहिती उपलब्ध नाही.
 
विषाणूचे वेगवेगळे प्रकार ओळखण्यासाठी जीनोम अनुक्रम पाहिला जातो.
 
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.
 
या महिन्यात केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत जेएन1 या व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
त्यांच्या मते, भारतात कोरोना-19 वर वर देखरेख ठेवणार्‍या इंसाकॉग या प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या नियमित सर्वेक्षणात हा नवा व्हेरिएंट आढळून आला.
 
जेएन 1: याची लक्षणं काय आहेत? कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे?
केरळमधील 79 वर्षीय महिला रुग्णाला सौम्य इन्फ्लूएंझा सारखी लक्षणे होती. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येत आहे.
 
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं की, अशी प्रकरणं देशाच्या इतर भागांमध्ये आधीच अस्तित्वात आहेत.
 
त्यांनी पत्रकारांशी बोलतना सांगितलं की,"महिन्यापूर्वी सिंगापूर विमानतळावर काही भारतीयांची तपासणी करण्यात आली होती तेव्हा हा व्हेरिएंट आढळून आला होता."
 
बीबीसीचे प्रतिनिधी श्रीनिवास निम्मगड्डा यांच्याशी बोलताना तिरुपती इथले पल्मोनोलॉजिस्ट भास्कर बसू यांनी सांगितलं की, "ज्या लोकांमध्ये हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे त्यांना थंडी वाजून येते, खूप थकवा जाणवतो. ताप येण्याचीही शक्यता असते.
 
ही लक्षणं बरी होण्यासाठी त्यांना दोन ते तीन दिवस लागू शकतात. मात्र रुग्णाला पूर्ण बरं होण्यासाठी एक आठवडा लागू शकतो. यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घेऊन विश्रांती घ्यावी."
 
डॉ. बसू म्हणाले की, "हा व्हेरिएंट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेएवढा भयावह नाहीये. थोडी खबरदारी घेऊन याचं संक्रमण टाळता येऊ शकतं. याला घाबरून जाण्याची गरज नाही. याशिवाय मास्कचा वापर करावा, रस्त्यावर कुठेही थुंकू नये, थंड पदार्थ, मद्यपान, सिगारेट आदी गोष्टी टाळाव्यात."
 
डॉ.भास्कर बसू यांनी म्हटलं की, जेएन.1 चा संसर्ग झाला असेल तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे चार ते पाच दिवस संपूर्ण विश्रांती घ्यावी.
 
कर्नाटक आणि तामिळनाडू देखील केरळमधील वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांवर लक्ष ठेवून आहेत.
 
कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यास परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी भारताच्या आरोग्य मंत्रालयाने अनेक राज्यांमधील रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन केलं आहे.
 
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) देखील केरळ मधील कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
 
आयसीएमआरचे महासंचालक राजीव बहल म्हणाले, "गेल्या काही आठवड्यात केरळमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इन्फ्लूएंझा सारख्या आजाराचे नमुने देखील कोरोनाच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले होते."
 
केंद्र सरकार करणार आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये वाढ
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय की जेएन1 संसर्गाचा प्रभाव गंभीर असल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.
 
राज्यांना दिलेल्या सूचनांनुसार, हा व्हेरिएंट आरटीपीसीआर चाचणीद्वारे तपासला जाऊ शकतो. सोबतच राज्यांना यापूर्वी जाहीर केलेल्या कोरोना-19 मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. यात आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्यात याव्यात अशी विशेष विनंतीही करण्यात आली आहे. जसजसा वेळ जाईल तसतसे नवीन व्हेरिएंट शोधण्याचा प्रयत्न केला जाईल.
 
ज्या रुग्णांना इन्फ्लूएन्झासारखे आजार आणि गंभीर तीव्र श्वसनाचे आजार झाले आहेत अशांना जिल्हा स्तरावरील रुग्णालयांमध्ये विशेष देखरेखी खाली ठेवावे अशी सूचना करण्यात आली आहे.
 
येणार्‍या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घ्यावी, लोकांनी खोकताना किंवा शिंकताना योग्य ती काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय की जेएन1 व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णाला मान्यताप्राप्त लस देता येऊ शकते.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती