मोड आलेली दूषित कडधान्ये खाल्याने 50 मृत्यू, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?

गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (17:20 IST)
- मार्क शिआ
पेशाने वकील असलेले बिल मार्लर हे गेल्या 30 वर्षांपासून अन्नात करण्यात येत असलेली भेसळ आणि विषबाधा यांच्याविरुद्ध लढत आहेत.
 
दूषित अन्न ग्रहण केल्यामुळे जडणारे विकार जसं की ई. कोलाई, सॅलमोनेला, लिस्टेरिया आणि इतर विषबाधा यांच्याबाबत सातत्याने जनजागृती करण्याचं कार्य मार्लर हे कित्येक अविरतपणे करत आहेत.
 
नुकतेच नेटफ्लिक्सवर खाद्यपदार्थांमधून होणाऱ्या विषबाधेसंदर्भात ‘पॉईझन्ड : द डर्टी ट्रूथ अबाऊट युअर फुड’ नामक एक माहितीपट (डॉक्युमेंट्री) प्रदर्शित करण्यात आली आहे.
 
या माहितीपटात बिल मार्लर यांनी महत्त्वाची भूमिका केली आहे.
 
बीबीसीशी केलेल्या चर्चेत बिल यांनी अन्नातून होणाऱ्या विषबाधा टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांबाबत अत्यंत उपयुक्त माहिती सर्वांना दिली.
 
मार्लर यांच्याप्रमाणेच पॉईझन्ड या माहितीपटात 17 वर्षीय स्टेफनी इनबर्ग हिची महत्त्वाची भूमिका आहे.
 
स्टेफनी ही अमेरिकेतील सेंट लुईस येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी ती आपल्या कुटुंबीयांसोबत डॉमिनिकन रिपब्लिक येथे पर्यटनासाठी गेली होती.
 
प्रवासाला निघतानाच स्टेफनीच्या पोटात दुखत होतं. पण त्याकडे दुर्लक्ष करून ती विमानाने डॉमिनिक रिपब्लिकच्या दिशेने रवाना झाली. तिथे पोहोचेपर्यंत तिची पोटदुखी आणखीनच वाढली.
 
रात्रीपर्यंत या पोटदुखीमुळे तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. दुसऱ्या दिवशी स्टेफनी उठली. पण ती आपल्या आईलाही ओळखू शकत नव्हती.
 
तिच्या मूत्रपिंडांनी (किडनी) काम करण्याचं थांबवलं होतं, तर मेंदूला सूज येऊन त्याचा परिणाम तिच्या संपूर्ण शरीरावर दिसून येत होता.
 
तिची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं लक्षात आल्यानंतर स्टेफनीच्या कुटुंबीयांनी तत्काळ आपला पर्यटनाचा प्लॅन रद्द केला.
 
ते थेट अमेरिकेला आपल्या घरी परतले. जवळच्या रुग्णालयात स्टेफनीला दाखल करण्यात आलं.
 
स्टेफनीला ई. कोलाई नामक बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं.
 
स्टेफनीवर उपचार सुरू करण्यात आले. पण तिची प्रकृती वरचेवर बिघडतच चालली होती.
 
मृत्यूशी झुंजत असलेल्या अवस्थेतच स्टेफनीने आपल्यावर ओढवलेल्या या परिस्थितीविषयी डॉक्युमेंट्रीमध्ये माहिती दिली आहे.
 
पुरेशी स्वच्छता न राखल्यास तुमची भूक भागवणारं चवदार जेवण तुमच्यासाठी कसं विष बनू शकतं, हे समजून घेण्यासाठी स्टेफनीचं एकमेव उदाहरण पुरेसं आहे.
 
डॉक्युमेंट्रीमध्ये बोलताना स्टेफनी म्हणते, “माझ्या किडनी अत्यंत कमकुवत बनल्या आहेत. त्यांचं काम योग्यरित्या चालावं यासाठी मला औषधांवर अवलंबून राहावं लागत आहे.
 
काही दिवसांतच किडनी पूर्ण पूर्णपणे निकामी झाले आहेत. भविष्यात माझ्या किडनीचं ट्रान्सप्लांटही करून घ्यावं लागू शकतं. किंवा आयुष्यभर डायलेसिसचे उपचार तरी मला करून घ्यावे लागतील.
 
विषबाधा कुठून झाली, या प्रश्नाचं उत्तर देताना स्टेफनी म्हणते, “मी त्यावेळी सलाड खाल्लं होतं.”
 
स्टेफनीप्रमाणेच दरवर्षी तब्बल 6 कोटी लोक दूषित अन्न खाल्ल्यामुळे गंभीररित्या आजारी पडतात. त्यापैकी सरासरी 4 लाख 20 हजार लोकांचा दरवर्षी विषबाधेमुळे मृत्यू होतो.
 
बिल मार्लर यांच्या मते, तुम्ही जे अन्न खाता त्याचं निरीक्षण करणं, त्याबाबत जागृत असणं तुमचं जीवन वाचवू शकतं.
 
अन्नातून होणारी विषबाधा टाळण्यासाठी काही काळजी घेणं आवश्यक आहे. कोणते अन्नपदार्थ कसे खावेत, हेसुद्धा महत्त्वाचं असल्याचं मार्लर सांगतात.
 
हे कोणते पदार्थ आहेत-
 
कच्चं दूध नकोच
बिल मार्लर यांनी कच्चं दूध अर्थात अनपाश्चराईज्ड दूधाचं सेवन करणं हे टाळायला हवं, असं स्पष्ट शब्दांत सांगितलं.
 
कच्च्या दूधातून ई. कोलाई बॅक्टेरियासारखे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
 
कच्चं दूध पिल्यामुळे मिळणाऱ्या फायद्यांबाबत चर्चा होते. पण त्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याच्या तुलनेत ते अत्यंत कमी आहेत, असं मार्लर यांनी सांगितलं.
 
आपण 19 व्या शतकात लोकांमध्ये पसरणारे आजार विसरून चालणार नाही, असं बिल म्हणाले.
 
मोड आलेली कडधान्ये
साधारपणे, मोड आलेली कडधान्ये ही आरोग्यदायी मानली जातात. मूग, मटकी, वाल आदी कडधान्ये भिजवून रात्रभर ठेवून त्यांना मोड आणून ती खाल्ली जातात.
 
पण बिल यांच्या मते, ही कडधान्ये दूषित असल्यास त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
 
खरंतर ओलावा आणि उष्मा यांच्या संपर्कात जीवाणू अतिवेगाने पसरतात. परिणामी, अनेकदा मोड आलेल्या कडधान्यामध्ये साल्मोनेलासारखे जीवाणूही असतात.
 
2011 साली मोड आलेली दूषित कडधान्ये खाऊन जर्मनीत 900 जणांच्या किडनी निकामी झाल्या. त्यापैकी 50 जणांना आपला जीव गमवावा लागला, असं बिल मार्लर म्हणाले.
 
ते म्हणतात, ही कडधान्ये उघड्यावर उगवलेली आणि साठवलेली असतात. तुम्ही ते घरी आणून थेट भिजवून मोड आणण्यासाठी ठेवता. ही प्रक्रियाही उघड्यावरच होते. अशा स्थितीत कडधान्यांवरील बॅक्टेरिया वाढण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते.
 
त्यामुळे अशा प्रकारची कडधान्ये कच्ची, न धुता खाऊ नयेत. ती नीट शिजवूनच असा सल्ला मार्लर देतात.
 
तज्ज्ञांच्या मते, कडधान्यं पाण्यात खूप काळ भिजवून ठेवू नयेत. त्यांना बंद ठिकाणीही बराच काळ ठेवणं योग्य नाहीये. जिथे हवा खेळती असते, अशा ठिकाणी कडधान्यांना मोड आणायला ठेवणं केव्हाही योग्य असतं.
 
खिमा उंडे नीट शिजवूनच खा
खिम्याचे उंडे हा अनेकांच्या आवडीच्या खाद्य प्रकार. साधारपणपणे मटण आपल्याला लाकडी ओंडक्यावर तुकडे करून देण्यात येत असतं.
 
मटणाचा खिमा बनवण्यासाठी मटणाचे तुकडे याच लाकडाच्या ओंडक्यावर बारीक करून दिले जातात.
 
ओंडके अस्वच्छ असल्यास या प्रक्रियेत खिम्यामध्ये बॅक्टेरिया मिसळण्याची शक्यता निर्माण होते.
 
आपण मटण आणल्यावर ते व्यवस्थित धुवू शकतो. पण खिमा बारीक असल्यामुळे तो योग्य रित्या धुता येत नाही. अशा स्थितीत खिमा हा योग्य प्रकारे शिजवणं गरजेचं असतं.”
 
अशा प्रकारचा दूषित खिमा हा ई. कोलाई नामक बॅक्टेरियाचं घर असू शकतं. अशा ठिकाणी एखाद्या सुईच्या टोकावर शेकडो मावतील इतक्या संख्येत ई. कोलाईचे बॅक्टेरिया असू शकतात.
 
ई. कोलाई बॅक्टेरिया हा कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूचं कारण ठरण्यासाठी पुरेसा आहे. तो जेवणात असला तरी त्याचा कोणताही विशिष्ट वास किंवा चव नसतो. आपल्या साध्या डोळ्यांनी पाहता येणार नाहीत, इतके ते सूक्ष्म असतात.
 
त्यामुळे, खिमा जर तुम्हाला खायचा असेल, तर तो एकदम व्यवस्थित शिजवून घेणं, हेच सर्वाच सुरक्षित आहे. अशा प्रकारचे बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी अन्न किमान 69 अंश सेल्सियस तापमानावर शिजवणं आवश्यक आहे, अशी माहिती मार्लर यांनी दिली.
 
न धुता वापरलेल्या भाज्या
ताज्या, हिरव्या भाज्या खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत, मात्र अनेकदा या भाज्या आजारपण आणि संसर्गाचंही कारण बनू शकतात.
 
डॉ. प्रतिभा लक्ष्मी सांगतात, “तुम्ही ज्या भाज्या खात आहात, त्या कोठे उगवतात हे पण खूप महत्त्वाचं आहे.”
 
“आजकाल शेतीच्या पद्धती खूप बदलल्या आहेत, त्या असुरक्षितही झाल्या आहेत. पीकांवर मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकं फवारली जातात. त्यामुळे भाज्या आणि फळं मीठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन मगच वापरावीत. नाहीतर संसर्ग किंवा अ‍ॅलर्जीचा धोका राहतो.”
 
डॉक्टर आरएसबी नायडूसुद्धा डॉ. प्रतिभा यांच्या म्हणण्याला दुजोरा देतात.
 
“आपण प्रामुख्याने साफ-सफाईबद्दल बोलायला हवं. अनेकदा आपण बातम्या ऐकतो की, पाणीपुरी खाल्ल्यानंतर फूड पॉयझनिंग झालं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. याचं सगळ्यांत मोठं कारण हे स्वच्छता नसणं आहे.”
 
“पदार्थ बनवणारे वापरल्या जाणाऱ्या भाज्या नीट साफ करत नसावेत किंवा जिथे ते या भाज्या शिजवतात, ती जागा स्वच्छ नसावी,” असंही डॉ. आरएसबी नायडू सांगतात.
 
कच्च्या भाज्यांमध्ये ई. कोलाई, साल्मोनेला आणि लिस्टेरियासारखे जीवाणू असतात. भाज्या शेतातून स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात त्यांच्यामध्ये जीवाणूंची वाढ होण्याचा धोकाही वाढतो.
 
अनेकदा हिरव्या भाज्या स्वयंपाकघरातील अस्वच्छतेमुळेही संक्रमित होतात. त्यामुळे कच्च्या भाज्या नीट स्वच्छ करून, धुवूनच वापरायला हव्यात.
 
कच्ची अंडी
कच्च्या अंड्यामध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असतात. अंड जोपर्यंत अखंड आहे, त्याच्या कवचाला कोणताही तडा गेलेला नाहीये, तोपर्यंत हे जीवाणू अंड्यात राहू शकतात. म्हणूनच तज्ज्ञ अंडी उकडून खाण्याचा सल्ला देतात.
 
CDC नुसार अंड्यातला पांढरा भाग आणि पिवळं बलक दोन्ही नीट घट्ट होत नाही, तोपर्यंत अंडी उकडून घ्यायला हवीत.
 
अंडी फ्रीजमध्ये ठेवतानाही फ्रीजचं तापमान अंड्यांच्या हिशोबाने सेट करायला हवं. शक्य असेल तर ताजीच अंडी वापरावीत.
 
आहारतज्ज्ञ नीता दिलीप सांगतात की, “अनेक दिवसांपर्यंत ठेवलेली अंडी फुटतात. अशी अंडी खाल्यामुळे अनेक पद्धतीचे संसर्ग होऊ शकतात. त्यामुळे अंडी खरेदी करताना त्यावरची तारीख पाहणं आणि शक्यतो ताजी अंडीच वापरणं हे अधिक उत्तम आहे.”
 
मासे, समुद्री अन्नपदार्थ कधीच कच्चे खाऊ नका
कच्च्या माशांमध्ये जीवाणूंसोबतच अनेक विषाणूही असतात. त्यामुळे जर मासा कच्चा खाल्ला तर अनेक आजार होण्याचा किंवा अगदी प्राणावर बेतण्याचा धोका असतो.
 
त्यामुळे अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या (CDC) सल्ल्यानुसार, मासे नीट स्वच्छ करून आणि शिजवूनच खायला हवेत.
 
प्रॉन्सबद्दलही CDC असाच सल्ला देते. ते सांगतात की, ‘प्रदूषित पाण्यामध्ये वाढणाऱ्या प्रॉन्समध्ये नोरोव्हायरस असतात. त्यामुळे प्रॉन्स धुवून तोपर्यंत शिजवायला हवेत, जोपर्यंत त्यांचा कच्चा वास निघून जात नाही.”
 
डॉक्टर प्रतिभा लक्ष्मी सांगतात, “मासे खरेदी करताना ते कुठून पकडले आहेत याची चौकशी शक्य झाल्यास करावी.”
 
त्या पुढे सांगतात, “आजकाल प्रदूषित पाण्यात मत्स्यशेती केली जाते. असे मासे खाल्यामुळे संसर्ग होऊ शकतो.”
 
“कच्चे मासे कधीही खाऊ नयेत. हीच गोष्ट माशांपासून बनलेल्या औषधांनाही लागू होते. मत्स्यपालन कसं केलं जातं? त्यांना पकडताना साफ-सफाईची किती काळजी घेतली जाईल? या गोष्टींचा विचार करायला हवा.”
 
हीच खबरदारी इतर समुद्री अन्नपदार्थ जसे की गोगलगाय, शिंपले आणि खेकडे खातानाही घेतली पाहिजे.
 
हे खाताना सर्वप्रथम ते स्वच्छ धुणे आणि नंतर व्यवस्थित शिजवणे या टप्प्यांमधून गेल्याशिवाय ते कधीच खाऊ नयेत.
 
पॅकेज्ड सँडविच
पॅकेज्ड सँडविच खाण्याआधी त्यावरची तारीख तपासण्याची सवय आपण लावून घ्यायला हवी.
 
पॅकेज्डपेक्षाही ताजं आपल्यासमोर बनवलेलं सँडविच खाणं कधीही चांगलं, असं बिल मार्लर यांनी म्हटलं.
 
अनेक दिवसांपूर्वी बनवलेलं सँडविच खाल्लास तुम्हाला लिस्टेरिया बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळतं.
 
बिल यांच्या मते, जगभरात अशा प्रकारचं शिळं सँडविच खाऊन अनेकांचा मृत्यू होतो. किंवा त्यांना रुग्णालयात तरी दाखल व्हावं लागतं.
 
लिस्टेरिया नामक बॅक्टेरिया फ्रिजमध्येही टिकून राहतो. त्यामुळे सँडविच फ्रिजमध्येही साठवलेला असला तरी ते शिळं कधीच खाऊ नये, असं मार्लर यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती