साबणाचा अतिवापर घातक

वॉशिंग्टन। शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी वापरले जाणारे साबण, शांपू, टूथपेस्ट अशा वस्तूंचा अतिवापर चक्क कर्करोगाला निमंत्रण देऊ शकतो. अमेरिकी विद्यापीठातील नवीन संशोधनानुसार कर्करोगाला कारणीभूत ठरणारा ट्राइक्लोजन घटक साबणात आढळून आला आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील सॅन डिएगो औषध विभागाने आपल्या नवीन संशोधन अहवालात सर्वांनाच साबणाचा अतिवापर टाळण्याचे आवाहन केले आहे. प्राध्यापक रॉबर्ट एच. दुकी यांनी सांगित्याप्रमाणे, कर्करोग आणि यकृताच्या रोगाला कारणीभूत असलेला ट्राइक्लोजन घटक साबणात आढळून आला आहे. या घटकाचा प्रयोगशाळेत उंदरावर प्रयोग करण्यात आला असता त्याला यकृत बिघाड आणि कर्करोग झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे उंदरांवर वाईट परिणाम करणारा ट्राइक्लोजन मानवावर तेवढाच वाईट परिणाम करू शकतो. असा दावा प्राध्यापकांनी केला आहे. उंदरांवर 6 महिने ट्राइक्लोजनचा प्रयोग केला असता त्यांच्यात कर्करोगाची लक्षणे दिसून आली. हा परिणाम मनुष्यावर 18 वर्षांत दिसून येऊ शकतो.

ट्राइक्लोजन नावाचा घटक केवळ साबणातच नव्हे तर अमेरिकेच्या वातावरणात सापडणार्‍या 7 प्रमुख घटकांपैकी एक आहे. ट्राइक्लोजन एक रोग प्रतिकारक घटक असला तरीही त्याचा अतिवापर जीवघेणा ठरू शकतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा