फुटबॉल खेळणे मधुमेहासाठी उपयुक्त

सोमवार, 16 जून 2014 (16:03 IST)
फुटबॉल खेळण्याने मधुमेही व्यक्तीला दिलासा मिळतो, असे एका नव्या अभ्यासातून दिसून आले आहे. टाईप-2 डायबिटीस असलेल्या रुग्णांच्या शरीरातील काही प्रक्रिया नियंत्रित आणि संतुलित करण्याची क्षमता फुटबॉलच्या खेळण्यातील हालचालींमध्ये असते असे या अभ्यासाअंती आढळून आले आहे. विशेषत: उच्च रक्तदाब असणार्‍या लोकांनी फुटबॉल अवश्य खेळावा. कोपनहेगन विद्यापीठातील सांघिक खेळावर संशोधन करणार्‍या संस्थेने हे संशोधन केले आहे.

या संशोधनामध्ये काही मधुमेहींना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना 24 आठवडे फुटबॉल खेळावा लागला. त्यांना आठवडय़ातून दोन वेळा मैदानावर उतरावे लागले. त्यांच्या खेळानंतर त्यांच्या रक्तदाबावर आणि रक्तशर्करेवर नजर ठेवण्यात आली. या लोकांच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसले आणि टाईप-2 डायबिटीस असलेल्या रुग्णांच्या उदरातील चरबी 12 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले. मधुमेहींच्या रक्तातील शर्करेचे प्रमाणसुद्धा 20 टक्क्याने कमी झाल्याचे या खेळानंतर निष्पन्न झाले.

वेबदुनिया वर वाचा