पोटावर झोपणं तुमच्या जीवावर बेतू शकतं..

बुधवार, 28 जानेवारी 2015 (16:23 IST)
पोटावर झोपणार्‍यांना खडबडून जागं व्हावं, अशी ही बातमी आहे. झोपताना पोटावर झोपणार्‍या फिटस्च्या रुग्णांवर अकस्मात मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त आहे. एखाद्या लहान बाळाच्या अकस्मात मृत्यूसमान ही लक्षणं दिसून येतात. एका नव्या शोधामध्ये ही गोष्ट समोर आलीय. 
 
फिटस् येणं हा मेंदूशी संबंधित एक विकार आहे. यामध्ये, रुग्णाला वारंवार फिटस्चा झटका येतो. जगभरातील जवळपास पाच करोड लोक या आजारानं पीडित आहेत. इलिनोइसमध्ये शिकागो विश्वविद्यालयाचे जेम्स ताओ यांच्या म्हणण्यानुसार, अनियंत्रित फिटस्च्या आजारात आकस्मिक मृत्यू ओढावतो.. आणि महत्त्वाचं म्हणजे, बर्‍याचदा झोपलेल्या अवस्थेत अशा रुग्णांचा मृत्यू होतो. 
 
याचं मुख्य कारण सांगताना शोधकत्र्यांनी रुग्णांचा मृत्यू पोटावर झोपल्यामुळे होत असल्याचं सांगितलंय. 
 
या अभ्यासानुसार, पोटावर झोपलेल्या स्थितीत 73 टक्के लोकांचा मृत्यू झाला. तर 27 टक्के लोकांची झोपण्याची स्थिती मात्र वेगळी होती. या अध्ययनात 253 आकस्मिक मृत्यूच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला होता. 
 
बर्‍याचदा, लहान मुलांप्रमाणे वयस्कर व्यक्तींमध्येही फिटस् आल्यानंतर जाग येण्याची क्षमता नसते. सामान्य झटका असेल तर हा धोका जास्त असतो. त्यामुळेच, फिटस्च्या आजारातून आकस्मिक मृत्यूपासून वाचण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे पोटावर न झोपता एका अंगावर किंवा पाठीवर झोपणं.. हा अभ्यास ऑनलाइन जर्नल न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झालाय.

वेबदुनिया वर वाचा