आत्मविश्वासासाठी सूक्ष्म अभ्यास- अनिरूध्द कुलकर्णी

MH News
MHNEWS
महाराष्ट्रातील तरुण स्पर्धा परीक्षेत आघाडीवर आहेत. सनदी परीक्षेतही उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, परंतु मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातील मुले मागे पडतात, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. चौफेर वाचन व आकलन क्षमता या गोष्टीद्वारे मुलाखतीमध्ये यशस्वी होता येवू शकते हा मंत्र दिला आहे, कोल्हापूरच्या अनिरूद्ध कुलकर्णी या गुणवंत तरूणाने... नागरी सेवा परीक्षेत ४२१ व्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या यशाची कहाणी, त्याच्याच शब्दांत...


मी तसा मध्यमवर्गीय कुटुंबातलाच.. सांगली येथील वालचंद महाविद्यालयात प्रथम मेकॅनिकल इंजिनिअरींगचा डिप्लोमा पूर्ण केला व त्यानंतर बुधगांवच्या वसंतराव पाटील महाविद्यालयात बी. ई. मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतर पुण्यात एका खाजगी कंपनीत सहा वर्षे मी नोकरी केली. हे काम करीत असताना प्रशासकीय सेवेत करीयर करण्याची मनापासूनच इच्छा होती. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून लोकापर्यत पोहोचता येतं, या उद्देशाने मी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निश्चय केला. लोकांमध्ये जावून त्यांचे प्रश्न प्रशासकीय पातळीवर सोडवावेत ही मनापासूनची इच्छा होती. त्याचबरोबर आपल्या कामाचा ठसा प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून उमटावता येतो. जनमानसात प्रशासनाबद्दल असलेली उदासिनता चांगल्या कामातून दूर करता येवू शकते यावर माझा विश्वास आहे. यामुळेच मी प्रशासकीय सेवेत येण्याचे निश्चित केले.

पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनी या संस्थेत सनदी परीक्षेससाठी तयारी करु लागलो. ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून माझ्या अभ्यासाला वेगळी दिशा मिळाली. अभ्यासाचे नियोजन कसे करावे, हे प्रथम मी आत्मसात करुन घेतले. सनदी परीक्षेसाठी निवडलेल्या विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी लागणारी संदर्भ पुस्तके व त्या विषयातले तज्ज्ञ या विषयी माहिती घेवून अभ्यासाला लागलो. अभ्यास करताना कांही प्रश्न मनात उपस्थित झाले तर त्या विषयातल्या तज्ञांकडे जावून मार्गदर्शन घेवू लागलो. अभ्यासाचे योग्य नियोजन व निवडलेल्या विषयांत सुक्ष्मपणे डोकावण्याची व ज्ञान आत्मसात करण्याची मला सवयच जडली, यामुळेच अभ्यास अधिक सुलभ होत गेला.

प्रथम पूर्व परीक्षेत मला अपयश आले. परंतु मी खचून गेलो नाही. पूर्व परीक्षेतून मला खूप काही शिकता आले. मी केलेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी मला माझ्या अपयशातून मिळाली. नंतर पूर्व परीक्षेसाठी खूप कष्ट व मेहनत घेतली. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे मनात लहानपासूनच बिंबवले गेल्यामुळे निराश न होता कष्ट, जिद्द या जोरावर मी पुन्हा अभ्यासाला सुरवात केली. दुसर्‍या प्रयत्नात अखेर पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालो.

मुख्य परीक्षेसाठी मी भुगोल व मानसशास्त्र हे दोन विषय निवडले. भुगोल हा विषय शालेय जीवनापासून माझ्या खूप आवडीचा होता, त्यामुळे हा विषय निवडला. मानसशास्त्रातही मला रस होता. माझ्या गुरुजणांनी हे दोन विषय निवडण्याविषयी मला योग्य ते मार्गदर्शन केले. या दोन्ही विषयांचा अभ्यास करताना वेळोवेळी ज्ञान प्रबोधिनीमधील प्राध्यापकांचे मार्गदर्शन अधिक मोलाचे ठरले. ज्ञान प्रबोधिनीच्या वर्गात शिकविलेल्या नोटस् या दिशादर्शक वाटल्या, या आधारे त्या-त्या विषयांतील संदर्भ ग्रंथ मिळवून सखोल अभ्यास केला. भुगोल व मानसशास्त्र या विषयांचा अभ्यास करतांना वेळेचे नियोजन केले. दोन्ही विषयांना समान वेळ देवून अभ्यास करु लागलो. नित्य नियमाने या दोन्ही विषयांचे सदंर्भ ग्रंथ शोधून अभ्यास केल्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढत गेला.

सामान्य अध्ययन या विषयाचा अभ्यास करताना वर्गातील नोटस् तसेच पुस्तके, संदर्भ साहित्य यावर मी अधिक भर दिला. दररोज दर्जेदार मासिकं चाळणे, वर्तमान पत्र वाचणे तसेच वाचनातून मनात बनलेली मतं नोंदवून ठेवणे, यामुळे सामान्य अध्ययन हा विषय मला कधीच अवघड वाटला नाही.

मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मी मुलाखतीचा सराव केला. मुलाखतीमध्ये विचारण्यात आलेले अनेक प्रश्न माझ्या शिक्षणाविषयी तसेच माझ्या जिल्हयाविषयी निगडीत होते. मी निवडलेल्या एच्छिक विषयावरही अनेक प्रश्न विचारण्यात आले. भ्रष्टाचार व माहितीचा अधिकार या विषयावरही मला प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही प्रशासकीय सेवेत आल्यानंतर भ्रष्टाचार कसा कमी कराल असाही प्रश्न मला विचारण्यात आला. विचारलेल्या प्रश्नांना मी दिलेल्या उत्तरात माझा आत्मविश्वास किती व माझी आकलन क्षमता किती याचे मुल्यमापन केले जात होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रश्नही मला विचारण्यात आले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण निवडून येवू शकतो व निवडून येण्यामागची कारणे काय असू शकतील असाही एक प्रश्न मला विचारण्यात आला. एकूणच मुलाखतीमध्ये व्यापक स्वरुपाचे प्रश्न समाविष्ट होते. इंग्रजी माध्यमातून मी मुलाखत दिली. वडील इंग्रजीचे प्राध्यापक असल्यामुळे इंग्रजी विषयात आवड निर्माण झाली.

या परीक्षेची तयारी करीत असताना वाईट अनुभव आले नाहीत. परंतु परीक्षेची तयारी करताना व्यक्तीश: माझ्यात खूप बदल झाला. समाजाशी निगडीत अनेक विषयांचा अभ्यास करतांना समाजातील आहे रे आणि नाही रे या गटांमधील फरक अनुभवतांना व्यवस्थेबद्दल कधी वाईट वाटायचे. परीक्षेची तयारी करीत असतांना माझे स्वत:चे व्यक्तीमत्व बदलले. समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.

प्रशासकीय सेवेत निवड झाल्याची माहिती ज्ञान प्रबोधिनीमधील मित्रांकडून मिळाली. परीक्षेत यश मिळेल, याची खात्री होतीच परंतु प्रशासकीय सेवेसाठी निवड झाल्याचे कळल्यानंतर मनस्वी आनंद झाला. लगेच ही माहिती मी आई-वडीलांना कळविली. त्यांनाही माझ्या यशामुळे खूप आनंद झाला. माझ्या मुलाने जे कष्ट केले त्याचे फळ मिळाले असे माझ्या आईचे उद्गार होते.

प्रशासकीय सेवेत इच्छुक असणार्‍या तरुणांनी पूर्व परीक्षा ते मुलाखत यामधील प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ऐच्छिक विषय निवडताना आवडीचेच विषय निवडावेत. एखादा विषय स्कोरींग मिळवून देतो म्हणून विषय निवडू नये. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी काळजीपूर्वक नियोजन करावे, निवडलेल्या विषय अधिक सुक्ष्मपणे अभ्यासला जावा. सामाजिक विषयासंदर्भात स्वत:ची मते बनविली पाहिजेत. मुलाखतीमधील प्रश्न अधिक व्यापक स्वरुपाचे असतात, त्यामुळे आपल्या उत्तरातील आत्मविश्वास वाढवायचा असेल तर सुक्ष्म अभ्यास महत्वाचा आहे.

महाराष्ट्रातील तरुण स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत नक्कीच उदासिन नाही, आता परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रातील तरुण स्पर्धा परीक्षेत आघाडीवर आहेत. सनदी परीक्षेतही उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, परंतु मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातील मुले मागे पडतात, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. चौफेर वाचन व आकलन क्षमता या गोष्टीद्वारे मुलाखतीमध्ये यशस्वी होता येवू शकते. कष्ट, जिद्द व चांगले मार्गदर्शन यावर भर दिले तर यश दूर नाही.

साभार- महान्यूज

वेबदुनिया वर वाचा