मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण

WDWD
एक खूप प्राचीन कथा आहे. श्वेतकी नावाचा एक राजा होता. तो खूप यज्ञ करत असे. त्यामुळे त्याची खूप ख्याती झाली होती. त्याने एकदा सलग बारा वर्षे अग्नीदेवाला अखंड शुद्ध तुपाची आहुती दिल्याने अग्नी देवाची पाचनशक्ती वाढली. याचा वाईट परिणाम असा झाला, की अग्नीदेवतेचे तेज कमी झाले आणि तो मंद पडला

मग त्याने ब्रह्मदेवाकडे धाव घेतली आणि त्यांना तेज परत मिळविण्याचा मार्ग विचारला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला खांडव येथील जंगल जाळून टाकण्याचा सल्ला दिला. त्याने तसे केले, परंतु इंद्रदेवाने पाणी टाकून ती आग विझवली. मग त्याने कृष्ण आणि अर्जुनाला आपल्या साह्यतेचे आवाहन केले.

अर्जुनाने अग्नी देवाला विनंती केली, की मला देवेंद्राशी युद्ध करण्यासाठी तू शस्त्रे पुरवायची. अग्नी देवाने त्याला गांडीव धनुष्य आणि दिव्यास्त्र दिले, तर कृष्णाला एक चक्र भेट दिले. यानंतर अग्नी देवाने आपल्या शक्तीद्वारे पुन्हा खांडव जंगल जाळण्यास सुरुवात केली.

वाढत्या आगीने पृथ्वीवर मात्र हाहाकार माजला. त्यावर परत देवेंद्राने आपल्या शक्तीने पाऊस पाडण्यास सुरुवात केली, परंतु अर्जुन आणि कृष्णाने पावसाला रोखले. यावेळी इंद्राच्या मदतीला देव, असुर, यक्ष, राक्षस, सर्प असे अनेक जण धावून आले, परंतु या साऱ्यांचा कृष्ण आणि अर्जुनापुढे निभाव लागला नाही.

अखेर अग्नी देवतेने आपली आग पसरवल्याने त्यांची तब्बेत पूर्ववत झाली. आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेज परतले. तात्पर्य इतकेच की, जर शरीर सुखी असेल, तर मनही प्रसन्न राहते. आणि मन प्रसन्न तर चेहऱ्यावर आपोआप तेज दिसते.

तुम्हाला ताजेतवाने दिसायचे असेल तर तुम्हाला आपले शरीर तर स्वस्थ ठेवायलाच हवे. परंतु, याच सोबत आपले मनही प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे.

वेबदुनिया वर वाचा