केवळ सव्वा वर्षांची असताना मेंदुज्वरामुळे दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता गमावलेली एक मुलगी आज जगविख्यात लेखिका म्हणून नावारूपाला आली आहे. तुम्हाला हा चमत्कार वाटत असेल तर, त्याची जनकही हीच मुलगी आहे. हेलेन केलर असे या मुलीचे नाव.
आपल्या केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तिने आपल्या कठीण मानल्या जाणार्या आजारालाही नियंत्रित केले. ज्या वयात तिचे खेळायचे-बागडायचे दिवस होते, त्या वयात तिच्या पुढ्यात केवळ अंधार होता.
आजारामुळे तिला सुरुवातीला नैराश्य आले होते. तिच्या पालकांनी मग तिची जबाबदारी एनी सुलियन यांच्याकडे सोपवली. अगदी ब्लॅक चित्रपटात अमिताभ ज्या पद्धतीने राणी मुखर्जीला स्पर्शाची भाषा शिकवतो. अगदी त्याच पद्धतीने एनीने हेलेनला स्पर्शाची भाषा शिकवली.
यानंतर एनीने तिला भाषा शिकवण्यासाठी जिवाचे रान केले. तिला प्रथम हाताने भाषा शिकवत शब्दांचे अर्थ तिला समजावले. यानंतर हेलरच्या मनात नवीन उमेद जागी झाली. हेलरने यानंतर कधीही मागे वळून पाहायचेच नाही हे ठाम केले.
तिच्यात एक अशी ऊर्जा निर्माण झाली, की या ऊर्जेने तिला नवीन दृष्टी दिली, आणि ही ऊर्जा होती तिच्या इच्छा शक्तीची. या बळाच्या आधारेच तिने रेडक्लिफ महाविद्यालयातून आपली पदवी मिळवली. या दरम्यान हेलेनचे पहिले पुस्तक 'द स्टोरी ऑफ लाईफ' प्रकाशित झाले. यानंतर याचे जवळपास 50 भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर करण्यात आले.
इथे हेलन यांच्या केवळ इच्छाशक्तीचाच विजय झाला. त्यांनी बालपणातच जर हार मानली असती तर जगाला इतकी प्रतिभाशाली लेखिका मिळालीच नसती. म्हणूनच केवळ इच्छाशक्तीच्या बळावरच आपण विजय मिळवू शकतो हे विसरता कामा नये.