कार्पोरेट जगत आणि ज्योतिषशास्त्रात असणारा संबंध

सोमवार, 14 जानेवारी 2019 (11:41 IST)
व्यक्तीचे व्यावसायिक यश त्याचे कर्तृत्व आणि मेहनतीवर अवलंबून असले तरीसुद्धा तुमची जन्मतिथी आणि ऋतू हे घटक देखील तुमचे करिअर निर्धारित करण्यात अत्यंत महत्वाचे असतात. सौडर स्कूल ऑफ बिझीनेस आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया या विद्यापीठाच्या संशोधकांनी एका सर्वेक्षणाअंती हा निष्कर्ष काढला आहे. उन्हाळ्यात जन्मणारी मुले कार्पोरेट क्षेत्रात फारशी यशस्वी होत नाहीत. त्यामुळे अशा मुलाकडून सीईओ होण्याची अपेक्षा करणे अयोग्य असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. 500 पेक्षाही अधिक सीईओंचा अभ्यास केल्यानंतर ही बाब संशोधकांच्या ध्यानात आली. 
 
जन्मतिथी आणि ऋतू यांचा मुलांच्या बुद्धिमत्तेवर देखील आमूलाग्र परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे, पण याचबरोबर प्रचलित शिक्षणपद्धतीचा मुलांच्या व्यावसायिक यशावर अधिक परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले. जून आणि जुलैमध्ये जन्मलेली मुले त्यांच्या शालेय जीवनामध्ये अधिक तरुण तर मार्च आणि एप्रिलमध्ये जन्मलेले तुलनेने अधिक प्रौढ आढळून आले आहेत. या नव्या संशोधनामुळे कार्पोरेट जगत आणि ज्योतिषशास्त्र यांचा संबंध स्पष्ट झाल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत, पण अनेकांनी मात्र या संशोधनावर विश्वास ठेवण्यास नकार दिला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती