२२ मार्चला शनी येणार सूर्यासमोर

वेबदुनिया

शुक्रवार, 12 मार्च 2010 (11:54 IST)
ND
ND
एरवी भल्याभल्यांना आपल्या साडेसातीच्या चक्रात भेडसावून सोडणारा शनी ग्रह येत्या २२ मार्चला थेट सूर्यासमोर येणार आहे. ही घटना खगोलशास्त्रात प्रतियुती या नावाने ओळखली जाते. या काळात पृथ्वीपासून ग्रहाचे अंतर थोडे कमी असते. शनीची कडा ही साध्या डोळ्याने दिसू शकत नाही. त्याकरिता दुर्बिणीची आवश्यकता आहे. परंतु, शनीची कडा सध्या पृथ्वीच्या प्रतलात असल्याने दुर्बिणीतूनसुद्धा स्पष्टपणे दिसू शकणार नाही, अशी माहिती येथील हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे.

या आधी ८ मार्च २००९ ला शनी-सूर्य प्रतियुती झाली होती. शनीचे पृथ्वीपासून सरासरी अंतर १२७.७ कोटी किलोमीटर आहे. या ग्रहाला एकूण ४६ चंद्र आहेत. सर्वात मोठा चंद्र टायटन हा आहे. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास २९.५ वर्षे लागतात. या ग्रहाचा व्यास १ लाख २० हजार किलोमीटर आहे. पृष्ठभागाचे तापमान शून्याखाली १८० अंश सेंटिग्रेड आहे. टायटन या शनीच्या चंद्रावर विपुल प्रमाणात तलाव असल्याचे आढळून आले आहे. मात्र, हे तलाव पाण्याने भरलेले नसून द्रवरूप झालेल्या मिथेन आणि इथेन या वायूंनी भरलेले आहेत.

या खगोलीय घटनेचा सजीव सृष्टीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. शनीचा संबंध नेहमी मानवी जीवनासोबत जोडला जातो. परंतु खगोलशास्त्रानुसार शनीचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. शनीविषयीच्या अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कोणताही आधार नाही. सध्या शनी सायंकाळनंतर पूर्वेकडे दिसतो व पहाटे पश्चिमेकडे मावळतो. साध्या डोळ्यांनी शनी काळसर व पिंगट दिसतो, अशी माहिती विजय गिरुळकर यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा