National Education Day 2021 राष्ट्रीय शिक्षण दिन का साजरा केला जातो, जाणून घ्या माहिती

गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (11:45 IST)
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. मौलाना आझाद हे कवी, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक होते. देशातील अनेक मोठ्या शैक्षणिक संस्थांचा पाया रचण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
 
आझाद यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. मौलाना अबुल कलाम आझाद 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत देशाचे पहिले शिक्षण मंत्री होते. 2008 मध्ये, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांची जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.
 
देशाचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या कार्यकाळात 1951 मध्ये देशातील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आणि 1953 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग (UG C) ची स्थापना झाली. यासोबतच एआयसीटीई सारख्या संस्थांच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
 
मौलाना अबुल कलाम आझाद यांचे 22 फेब्रुवारी 1958 रोजी दिल्लीत निधन झाले. 1992 मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांना मरणोत्तर देण्यात आला.
 
11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चर्चासत्र, परिसंवाद, निबंध लेखन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणाच्या सर्व पैलूंवर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात चर्चाही होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती