ताजमहाल कोणी व का बांधला?

गुरूवार, 9 एप्रिल 2015 (14:56 IST)
शहाजहान या दिल्लीच्या मोगल सम्राटाने (१६१४-१६६६) मुमताज नावाच्या आपल्या लाडक्या राणीच्या स्मरणार्थ हा महाल बांधला. दिल्लीजवळील आग्रा या गावी ही देखणी इमारत आहे. जगातल्या सुंदर इमारतींमध्ये ही इमारत श्रेष्ठ गणली जाते. पर्शियन संस्कृतीचे दर्शन या बांधकामात घडते. या इमारतीच्या नावाचा अर्थ 'महालांचा मुकुटमणी' असा होतो. पांढरा संगमरवरी दगड वापरून आणि किमती खड्यांनी नक्षी करून या अष्टकोनी इमारतीचे सौंदर्य वाढविलेले आहे. १३0 फूट रुंद आणि २00 फूट उंच अशी ही देखणी इमारत आले. यमुनेच्या तिरावर ती उभी आहे. सभोवती पर्शियन बागांची योजना करून ती अधिक सुशोभित केली आहे.
 
आत घुमटाखाली शहाजहान आणि मुमताज बेगम यांची स्मारके आहेत. आतल्या भिंतींवर फुलांची नक्षी आणि कुराण-धर्मग्रंथातील वचने आहेत. यासाठी अनेक मौल्यवान दगड वापरले आहेत. प्रत्यक्ष राजा-राणी यांच्या कबरी तळघरात असून, तेथे अत्यंत साधेपणा आढळतो.
 

वेबदुनिया वर वाचा